Fri, Mar 22, 2019 07:41होमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदम जिल्ह्यातून हद्दपार

श्रीपाद छिंदम जिल्ह्यातून हद्दपार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शिवराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी कारागृहातून बाहेर आलेल्या श्रीपाद छिंदम याला नगर जिल्ह्यातून 15 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 2) सकाळी तडीपारीचा प्रस्ताव मंजून होताच दुपारी तोफखाना पोलिसांनी छिंदम याच्या घरी जाऊन सदर आदेश बजाविला. छिंदम हा काही दिवसांपासून नगरमध्येच राहत होता.

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा श्रीपाद छिंदम याच्या फिर्यादीवरून त्याच्या दिल्लीगेट येथील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींमध्ये छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 

छिंदम याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. उपमहापौर असताना छिंदम याने 16 फेब्रुवारी रोजी मनपा कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी मोबाईलवरून संभाषण करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. तेव्हापासून राज्यभरात छिंदम याच्याविरुद्ध जनमानसात तीव्र रोष आहे. त्याला 16 फेब्रवारी रोजी अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर छिंदम याच्याविषयी संताप व्यक्त करणार्‍या क्‍लिप व्हायरल होत आहेत. छिंदम हा काही दिवसांपासून नगरमध्ये त्याच्या तोफखाना परिसरातील घरी राहण्यासाठी आलेला होता. त्याच्याविषयी संतापाची भावना असल्याने नगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे छिंदम याला नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, यासाठी तोफखाना पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 (2) अन्वये 28 मार्च रोजी उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. 

उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सोमवारी सकाळी हा तडीपारीचा प्रस्ताव मंजूर केला. तडीपारीचा आदेश प्राप्त होताच तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी छिंदम याच्या घरी जाऊन त्याला आदेश बजाविला आहे. त्याला 15 दिवसांसाठी नगर जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा श्रीपाद छिंदम याने तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन 16 फेब्रुवारी रोजी त्याचे कार्यालय व घरासमोरील वाहनांची तोडफोड करणार्‍यांविरुद्ध फिर्याद दिली. त्याने फिर्यादीत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबाबतच्या संभाषणाची ऑडिओ क्‍लिप मनपा कर्मचारी बिडवे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यानंतर क्‍लिपमधील संभाषणाच्या रागातून 35 ते 40 जणांच्या टोळक्याने हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन दिल्लीगेट येथील कार्यालयाचेे कुलूप तोडून शटरची तोडफोड केली. तसेच बोर्डची मोडतोड केली व घरासमोर लावलेल्या गाड्यांचेही नुकसान केले. 

याप्रकरणी छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजेंद्र नारायण दांगट, योगेश देशमुख, स्वप्निल दगडे, गोरख दळवी, भावड्या अनभुले, चेतन शेलार ऊर्फ बु्रस्ली, विरेश तवले, रोहीत गुंजाळ, धनंजय लोकरे, बाबासाहेब रोहोकले, धनवान दिघे, हरीष भांबरे, गिरीष भांबरे, फुंदे (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर 20 ते 25 जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सणस हे करीत आहेत. 


  •