Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Ahamadnagar › फाशीची अंमलबजावणी व्हावी

फाशीची अंमलबजावणी व्हावी

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 10:47PMकर्जत : प्रतिनिधी

कोपर्डीच्या ‘निर्भयाकांड’ घटनेतील आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून, त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, अशी मागणी काल (दि. 13) कोपर्डीत झालेल्या श्रद्धांजली सभेत करण्यात आली. यावेळी छावा संघटनेने बीड येथून 18 जलैला मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. 

‘निर्भया’वरील अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेस काल (दि. 13) दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे ग्रामस्थ, सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, छावा संघटना, श्रद्धा प्रतिष्ठानसह विविध संघटनांनी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. औरंगाबाद, बीड, लातूर, नगर, पुण्यासह विविध भागामधून हजारो नागरिक कोपर्डीत आले होते. त्यामध्ये टिळक भोस, नामदेव राऊत, मंजूषा गुंड, मधुकर राळेभात, राजेंद्र फाळके, ज्योती सपाटे, बाळासाहेब साळुंके, नीलेश तनपुरे, राहुल नवले, रमेश केरे पाटील, रवींद्र काळे, समीर पाटील, आबासाहेब पाटील, बळीराम धांडे, दत्तात्रय भोसले, सजंय सांवत, महेश डोंगरे, दीपक तनपुरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रथम सामूहिक शपथ आणि नंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. 

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस म्हणाले की, कोपर्डीत घडलेली घटना आजही आठवली तरी आमच्या भावना तीव्र होतात. आमच्या ताईवर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही राज्यभर आंदोलने केली. न्यायालयाने तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा दिली आहे. खटल्याचे कामही वेगात झाले. मात्र, आता खंडपीठात देखील या शिक्षेची अंमलबजावणी होऊन, या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. हिच खरी श्रद्धांजली असणार आहे. आपली आंदोलने संविधानाने घालून दिलेल्या चाकोरीत व्हावीत. आपण ‘ठोक मोर्चा’ काढणार. मात्र, ज्यांना ठोकायचे ते देखील आपलेच आहेत. त्यामुळे मतपेटीमधून योग्य लोक जोपर्यंत आपण सत्तेवर बसवत नाहीत, तोपर्यंत अशा घटना रोखणे अवघड आहे. 

नामदेव राऊत म्हणाले की, कोपर्डी येथील घटना संतापजनक होती. या घटनेमध्ये आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी केली. मंजूषा गुंड म्हणाल्या की, आमच्या परिसरातील एक उत्कृष्ट खेळाडू असलेल्या विद्यार्थिनीवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आरोपींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी केली. तसेच कुळधरण येथे पोलिस चौकी व कोपर्डी येथे इतर सुविधा देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप सुविधा मिळालेल्या नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. यावेळी अनेकांनी मराठा समाजावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात ‘ठोक मोर्चा’ काढण्याचे जाहीर केले. तसेच न्याय मिळेपर्यंत आंदोलने उभारणार असल्याचे सांगितले.