Sat, Feb 23, 2019 08:51होमपेज › Ahamadnagar › माजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर!

माजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर!

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 13 2018 11:31PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवराय व शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेला नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हा काल (दि. 13) दुपारी तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर येताच तो राज्याबाहेर पळाल्याची चर्चा आहे. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर, त्याने सोमवारी न्यायालयात वैयक्‍तिक जातमुचलक्याची पूर्तता केली होती. 

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला श्रीपाद छिंदम हा गेल्या तीन आठवड्यांपासून नाशिकरोड कारागृहात होता. शुक्रवारी (दि. 9) त्याला नगरच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले होते. याच दिवशी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला दोन्ही गुन्ह्यांत न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्‍तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता; तसेच एका गुन्ह्यात जामीन देताना, दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची अट घातली होती. 

मात्र, जामीन मिळाल्यानंतरही छिंदम याच्याकडून जातमुचलक्याची पूर्तता करण्यात आली नव्हती. त्यामुळे तो अद्याप तुरुंगातच होता. सोमवारी दुपारी छिंदम याच्या भावाने न्यायालयात वैयक्‍तिक जातमुचलक्याची पूर्तता केली. त्यानंतर मंगळवारी (दि. 13) दुपारी छिंदम याची नाशिक रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. 

छिंदम याच्या सुटकेनंतर नाशिकमध्ये तणाव निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्तात त्याला नाशिक शहराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तो दक्षिणेतील राज्यात गेल्याची चर्चा आहे. छिंदम याने न्यायालयाकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने त्याला त्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे अर्ज करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात आले.