Thu, Feb 21, 2019 09:11होमपेज › Ahamadnagar › प्रत्येक गाव पाणीदार झाले पाहिजे : राम शिंदे

प्रत्येक गाव पाणीदार झाले पाहिजे : राम शिंदे

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 23 2018 11:23PMकर्जत : प्रतिनिधी 

वॉटरकप स्पर्धा ही प्रत्येक गावासाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे प्रत्येेक गाव पाणीदार झाले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

तालुक्यातील दूरगाव या गावाने वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला असून, गावात सुरू असलेल्या श्रमदानात पालकमंत्री प्रा. राम शिंदे सहभागी झाले.तसेच गावातील जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर, सरपंच अशोकराव जायभाय, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, नानासाहेब निकत, सुनील शेलार, धनराज कोपनर, विजय पावणे, राहुल अनारसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. शिंदे म्हणाले, दूरगावने वॉटरकप स्पर्धेमध्ये केवळ सहभाग नोंदवला नाही, तर गावाचा सर्वांगीण विकासासाठी कंबर कसली आहे. या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा. जेव्हा एखादी गोष्ट महिला हातामध्ये घेतात, तेव्ही ती तडीस जाते, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. आज येथे माता-भगिनींची गावासाठी असणारे प्रेम आणि तळमळ आणि त्यामधून सुरू असलेले श्रमदान पाहूनच मीही श्रमदान केले. गावाने एक दिलाने असेच काम करावे. मी दूरगाव सोनाळवाडी रस्त्यासाठी 1 कोटी 50 लाख रूपये 1 महिन्याच्या आत मंजूर करून देतो, असे शेवटी ना. शिंदे म्हणाले. प्रास्ताविक सरपंच अशोक जायभाय यांनी केले. ते म्हणाले, आम्ही गाव हागणदारीमुक्त केले. गावात दुर्मिळ असे दुर्योधन मंदिर आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक येथे येतात. त्यामुळे गावाला जोडणारे रस्ते डांबराचे असावेत. यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष निधी द्यावा. 

 

Tags : ahamadnagar, Karjat news, water,  Ram Shinde,