Sun, Mar 24, 2019 08:19होमपेज › Ahamadnagar › नगरसेवकांना १२ लाखांचा विकास निधी!

नगरसेवकांना १२ लाखांचा विकास निधी!

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMनगर : प्रतिनिधी

मनपा प्रशासनाने सादर केलेल्या 619 कोटींच्या अंदाजपत्रकातील अनावश्यक तरतुदींवरुन स्थायी समितीच्या सदस्यांनी प्रशासनाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. विविध तरतुदींना कात्री लावतांनाच प्रभागांमधील विकासकामांसाठी नगरसेवक निधीच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या निधीत वाढ केली आहे. सदस्य प्रभाग स्वेच्छा निधीत प्रशासनाने 6.31 कोटींची तरतूद केल्यानंतर ‘स्थायी’ने 2.55 कोटींची तरतूद वॉर्ड विकास निधीमध्ये केली आहे. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामांसाठी 12 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

स्थायी समितीत प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात काल (दि.20) दिवसभर चर्चा होऊन त्यात सुधारणा सुचविण्यात आल्या. सभापती जाधव यांच्यासह नगरसेवक बाबासाहेब वाकळे, संजय शेंडगे, दत्ता कावरे आदींनी याबाबत सूचना मांडून अनावश्यक तरतुदींबाबत जाब विचारला. हिवताप प्रतिबंध योजनेतील कंत्राटी पध्दतीने फवारणी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 30 लाखांच्या तरतुदीला 10 लाखांची कात्री लावण्यात आली. सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीमधील 10 लाख, नवीन वाहन खरेदीमधील 5 लाख, वृक्षारोपण, संवर्धन, ट्री गार्ड खरेदीची 25 लाखांची तरतूद कमी करण्याची शिफारस ‘स्थायी’कडून करण्यात आली. विद्युत साहित्य खरेदीची 70 लाखांची तरतूदही 20 लाखांची कमी करण्यात आली. नवीन वीजेचे खांब उभारणे, पथदिवे फिटींग करणे यासाठी प्रस्तावित 10 लाखांची तरतूद 9 लाखांची कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वार्ड विकास निधीसाठी 2.55 कोटींची तरतूद करतांनाच सर्वसाधारण करवसुलीत 5 टट्टे वाढ सुचविण्यात आली आहे. वसुलीसाठी ठोस पावले उचलून कठोर कारवाई करावी, वसुली न झाल्यास या अंदाजपत्रकालाही काही अर्थ राहणार नाही, गाळा भाड्यांची वसुली, हस्तांतर प्रक्रिया राबवावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. त्यासाठी गाळा भाडे वसुलीत 20 लाख तर हस्तांतर फीच्या तरतुदीमध्ये 10 लाखांची वाढ करण्यात आली. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी आकारल्या जाणार्‍या दंडात्मक कारवाईच्या उत्पन्नातही 50 लाखांची वाढ सुचविण्यात आली आहे. अतिरिक्‍त चटई क्षेत्र निर्देशांक प्रीमियम पोटी लेखाशीर्षात 25 लाखांची वाढ सभापती जाधव यांनी प्रस्तावित केली आहे. या शिवाय अनधिकृत नळकनेक्शनवरील कारवाईतून मिळणार्‍या उत्पन्नात 2 कोटींची वाढही सुचविण्यात आली आहे. शहरात 64 हजार निवासी मालमत्ता असून 53 हजारच नळ कनेक्शन आहेत. त्यामुळे उर्वरीत 11 हजार नळकनेक्शन धारकांवर कारवाई करुन ते नियमित करुन घ्यावेत, असे आदेश यावेळी देण्यात आले. बिगरशेतीचे प्रस्ताव सादर करतांना संबंधित मालमत्तांना मनपाकडून टॅक्स आकारणी होणे आवश्यक आहे. ती सुरु करावी. त्यासाठी नवीन लेखाशीर्ष करुन 50 लाखांची तरतूद करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

दरम्यान, शहरातील महालक्ष्मी उद्यान, सिध्दीबाग खासगी तत्वावर चालविण्यास देण्यात यावे. कोंडवाडाही खासगी तत्वावरच चालविला जावा. प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, त्यासाठी 25 लाखांची तरतूद करावी. शहराचे विद्रुपिकरण रोखण्यासाठी प्लॅस्टिक कलेक्शन सेंटर उभारावेत, त्यासाठी 2 लाखांची तरतूद करावी, अशा शिफारसी यावेळी करण्यात आल्या. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, छत्रपती संभाजी महाजारांचा पुतळा बसविण्यासाठी अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जागा निश्‍चित करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे आदेश सभापती जाधव यांनी दिले. दत्तात्रय कावरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली. अनावश्यक तरतुदींना कात्री लावत, काही नवीन तरतुदींची शिफारस करत काल दिवसभर अंदाजपत्रकावर चर्चा झाली. स्थायी समितीच्या शिफारसीनुसार हे अंदाजपत्रकात आता महासभेकडे सादर केले जाणार आहे.