Thu, Jun 27, 2019 00:14होमपेज › Ahamadnagar › मढी विश्‍वस्तांविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल!

मढी विश्‍वस्तांविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल!

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:22PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान मढी ट्रस्टमधील विश्‍वस्त मंडळात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी बैठक बोलावली खरी. मात्र, या  बैठकीतच एका विश्‍वस्ताला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली. याबाबत विश्‍वस्त मधुकर माधव साळवे यांनी तब्बल दोन महिन्यांनी केलेल्या तक्रारीवरून तिघा विश्‍वस्तांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉॅसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. 

याबाबत मधुकर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धर्मदाय आयुक्तांनी 2015 ते 2020 सालापर्यंत मधुकर माधव साळवे यांची विश्‍वस्त म्हणून नेमणूक केलेली आहे. साळवे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. देवस्थानच्या इतर विश्‍वस्त मंडळींनी शिवशंकर अर्जून राजळे (रा. कासार पिंपळगाव) यांची अध्यक्ष म्हणून, तर साळवे यांची सहसचिव म्हणून निवड केलेली होती. 4 ऑगस्ट 2018 रोजी विश्‍वस्त मंडळाने अध्यक्ष राजळे व सहसचिव साळवे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता दोघांवरही अविश्‍वास ठराव दाखल केला. 

तसेच घाईघाईने नवीन अध्यक्ष व सहसचिव यांची निवड करून, प्रकरण मंजुरीसाठी धर्मदाय आयुक्तांकडे पाठविले होते. मात्र, याप्रकरणी धर्मदाय आयुक्तांनी अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.धर्मदाय आयुक्तांनी ट्रस्टचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार अध्यक्ष राजळे व कोषाध्यक्ष दत्तात्रय मरकड यांना दिलेले होते. मात्र, काही विश्‍वस्त परस्पर आर्थिक व्यवहार करत असल्याने, साळवे यांनी त्यांना विरोध दर्शवला. त्यामुळे विश्‍वस्त मंडळात वाद निर्माण होऊन विकासकामे ठप्प झाली होती. विश्‍वस्त मंडळात निर्माण झालेले मतभेद व गैरसमज दूर व्हावेत, या हेतूने गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन 13 जून 2018 रोजी देवस्थानच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली होती. या बैठकीत तिघा विश्‍वस्तांनी साळवे हे ट्रस्टमध्ये आपल्या मर्जीप्रमाणे काम करू देत नाहीत, असे म्हणत त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. याबाबत साळवे यांनी बुधवारी (दि.15) तब्बल दोन महिन्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिसांनी विश्‍वस्त सुधीर भाऊराव मरकड, देविदास विनायक मरकड, अण्णासाहेब देवराव मरकड यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विभागीय पोलिस उपाधीक्षक मंदार जवळे करत आहेत.