Thu, Jul 18, 2019 08:09होमपेज › Ahamadnagar › अतिक्रमणधारकाचा आत्मदहनाचा प्रयत्न!

अतिक्रमणधारकाचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 10:36PMनगर : प्रतिनिधी

सीना नदी पात्रात असलेले अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. अमरधाम परिसरातील हॉटेलवर सुरु असलेल्या कारवाईवेळी एका व्यक्‍तीने विषारी औषध घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल (दि.11) घडली. या प्रकरणी पांडुरंग तुकाराम बोरुडे यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मनपाच्या पथकाने कठोर भूमिका घेत सदरचे हॉटेल जमिनदोस्त केले.

‘मिशन सीना’ मोहिमेंतर्गत नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु आहे. काल सकाळी मनपाचे पथक अमरधाम शेजारील नदी पात्रात कारवाईसाठी पोहचले. या ठिकाणी नदी पात्राच्या हद्दीत साईप्रेम हॉटेल अतिक्रमण करुन सुरु करण्यात आले होते. वारंवा सूचना देऊनही त्यांनी स्वतःहून अतिक्रमण न हटविल्यामुळे मनपाच्या पथकाने काल कारवाई सुरुवात केली. यावेळी पांडुरंग बोरुडे यांनी कारवाईला विरोध करत हॉटेलच्या छतावर जाऊन विषारी औषध व रॉकेलच्या बाटल्या दाखवत आत्मदहनाचा इशारा दिला. मनपाचे अधिकारी त्यांना समजावून सांगत असतांनाच त्यांनी विषारी औषध घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून तपासणी रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी मनपाचे क्षेत्रीय अधिकारी विजय बोधे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आत्महत्येचा प्रयत्न करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बोरुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बोरुडे यांनी कारवाईला विरोध करुन केलेल्या प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, मनपाच्या पथकाने कठोर भूमिका घेत सदरचे हॉटेल कारवाई करुन जमिनदोस्त केले.