Mon, Jun 24, 2019 21:52होमपेज › Ahamadnagar › शिक्षकांची रिक्‍त पदे लवकरच भरणार : राम शिंदे 

शिक्षकांची रिक्‍त पदे लवकरच भरणार : राम शिंदे 

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 05 2018 11:44PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांसाठी शासनाने विविध माध्यमातून निधी दिला आहे. सर्वशिक्षा अभियान बंद झाल्याने शाळांसाठी निधीचे मार्ग बंद झाले असून, जिल्हा शाळांसाठी अतिरिक्त निधी देण्याचा शासनाचा विचार आहे. शिक्षकांची पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांबाबत जिल्हा परिषदेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून, राज्य पातळीवर ही पदे भरण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे या होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे, अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाघचौरे, कृषी सभापती अजय फटांगरे, राजेश परजणे, शिवाजी गाडे, प्रभावती ढाकणे, अनुसया होन, बाळासाहेब लटके, व्याख्याते जितेंद्र मेटकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

पालकमंत्री शिंदे म्हणाले की, उपक्रमशीलता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून जिल्हा परिषदेने शाळांचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली येथील शिक्षकांची बांधीलकी ही कौतुकास्पद आहे. आता ई-लर्निंग आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा जमाना आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर कमी झाले आहे. जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळत आहे. आपला विद्यार्थी या स्पर्धात्मक युगात टिकू शकेल, असे बनविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तास. मुलांसाठी आनंदनगरी, बाळमेळा अशा उपक्रम निश्चितच इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक आहे.
अध्यक्षा विखे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचे फलित आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत दिसून आले. शिर्डी संस्थानने दिलेल्या 10 कोटींच्या पहिल्या हफ्त्यात प्रत्येक तालुक्यात किमान 10 शाळा खोल्या होणार आहेत. या शाळा खोल्यांच्या बांधकामावर लक्ष ठेऊन दर्जेदार काम होण्यासाठी प्रयत्न करावेत. पुरस्कारार्थी शिक्षकांना एक पगारवाढ देण्यात येणार आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत लक्ष घालावे, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी, पोषण आहार दर्जेदार मिळावा अशा मागण्या विखे यांनी पालकमंत्र्यांकडे केल्या.

यावेळी व्याख्याते मेटकर यांचे सध्याची शिक्षणपद्धती यावर व्याख्यान झाले. प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील 14 शिक्षकांना तसेच एका केंद्रप्रमुखास पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासोबतच विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात पारितोषिके पटकावणार्‍या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.