होमपेज › Ahamadnagar › बाजारपेठेतील मालमत्तांवर मनपाची टाच!

बाजारपेठेतील मालमत्तांवर मनपाची टाच!

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 9:58PMनगर : प्रतिनिधी

मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेल्या जप्ती मोहिमेत काल (दि.25) बाजारपेेठेतील दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली. तर सावेडी रोडवरील बालिकाश्रम रस्त्यावर दोन निवासी फ्लॅटलाही टाळे ठोकण्यात आले. मनपाच्या माळीवाडा व सावेडी प्रभाग कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली.एम.जी.रोड वरील कस्तुरचंद परदेशी यांच्याकडे असलेल्या 1 लाख 14 हजार 902 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांचे दुकान सील करण्यात आले आहे. तर सारडा गल्ली येथील रतनबाई मिरांडीया यांच्याकडे 2.55 लाखांची थकबाकी असून वारंवार मागणी करुनही रक्कम न भरल्यामुळे प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे, कर निरीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्या पथकाने त्यांच्या मालमत्तेला टाळे ठोकले.

सावेडी प्रभाग कार्यालयाकडूनही काल बालिकाश्रम रस्त्यावरील दोन निवासी फ्लॅटला टाळे ठोकण्यात आले. प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर यांच्या पथकाने ही कारवाई केली. लेंडकर मळा येथील आयडीओ इन्फ्राकडे असलेल्या 1.86 लाखाच्या थकबाकीपोटी श्रीकृष्ण वृंदावन अपार्टमेंट मधील फ्लॅटवर कारवाई करण्यात आली. तर गौतम अपार्टमेंटमधील गुरुचरणसिंह सुरजसिंह पंजाबी यांच्याकडे 1.13 लाखाची थकबाकी आहे. त्यांच्या फ्लॅटलाही मनपाने सील ठोकले आहे. दरम्यान, एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर विद्यार्थी राहात होते. त्यांना बाहेर काढून मनपाने कारवाई केली. जागा मालकाने कराचा भरणा न केल्यामुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.