Mon, Apr 22, 2019 04:01होमपेज › Ahamadnagar › मराठा समाजाचा एल्गार, दक्षिणेत कडकडीत बंद

मराठा समाजाचा एल्गार, दक्षिणेत कडकडीत बंद

Published On: Jul 25 2018 1:36AM | Last Updated: Jul 24 2018 11:03PMनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाने छेडलेल्या आंदोलनास नगर दक्षिणेत जोरदार प्रतिसाद मिळाला. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नेवासा या तालुक्यांच्या गावांसह ग्रामीण भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिक-ठिकाणी रास्तारोको आंदोलने करण्यात आली. गोदापात्रात जलसमाधी घेतलेल्या स्व. काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सरकारचा निषेध व्यक्‍त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. किरकोळ स्वरुपाची दगडफेक, जाळपोळ होऊन सौम्य लाठीमारही झाला. मात्र कार्यकर्त्यांनी संयमाने आंदोलने केली. या आंदोलनांमुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्याबाबत ‘पुढारी’च्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी केलेले वृत्तांकन असे :

कर्जतला संतप्त तरुणांनी जाळले टायर

कर्जत : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी व काकासाहेब शिंदे या युवकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी काल कर्जत बंदची हाक दिली होती. त्यास व्यापारी बांधवांनी प्रतिसाद दिला. यावेळी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. संतप्त युवकांनी रस्त्यांवर टायर जाळले. काल सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेकडो युवक जमले व त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करीत राज्यातील सरकारचा तीव्र निषेध केला. त्यानंतर गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेऊन शहीद झालेला युवक काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहरामधून मोर्चा काढण्यात आला.

दुपारी साडेबारा वाजता कर्जत धील मेनरोडवर संतप्त युवकांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक व तहसील कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर संतप्त युवकांनी टायर जाळत जाळपोळ सुरू केली. यावेळी युवकांनी एक मराठा लाख मराठा... कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही... अशी जोरदार घोषणाबाजी करीत मराठा समाजाला आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा यल्गार युवकांनी केला. या दोन ठिकाणचे आंदोलन झाल्यावर अक्काबाई चौकामध्ये टायर जाळून आंदोलन केले. कर्जत शहरामध्ये या आंदोलनाची धग सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरूच होती. 

शाळा, महाविद्यालये बंद

कर्जत शहरामध्ये काल सकाळी शाळा व महाविद्यालये भरली होती. मात्र नंतर सुटी देण्यात आली. काही शाळा तर भरल्याच नाहीत. महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून, सोमवारी (दि.23) औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे मराठा तरुण काकासाहेब शिंदे याने गोदावरी नदीत उडी मारून जलसमाधी घेतली. त्यामुळे काल सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होतीे. सरकारच्या मुर्दाड धोरणाविरुद्ध व शिंदे यास श्रद्धांजली वाहण्यासाठी कर्जत येथे शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात एकत्र होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सरकारचा निषेध व्यक्त करून मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची भावना व्यक्त केली. कर्जत शहरातील सर्व व्यापार्‍यांनी उत्स्फर्त कडकडीत बंद ठेवला. हे आंदोलन असेच तीव्र करण्यात येईल, असे समन्वयक नानासाहेब धांडे यांनी सांगितले.

शेवगावात बसवर दगडफेक

शेवगाव : प्रतिनिधी

आरक्षण मुद्यावर मराठा समाज आक्रमक झाला असून कायगाव येथे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या युवकाला श्रध्दांजली व शासनाचा निषेध करण्यासाठी शेवगाव शहरात मराठा समाज हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. शहर कडकडीत बंद ठेवून रास्तारोको करण्यात आला. जमावाने एस. टी. बसवर दगडफेक केल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

मराठा आरक्षण मागणीसाठी औरगांबाद जिल्ह्यात कायगाव येथे आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे याने सोमवारी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने काल (मंगळवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिल्यावरुन शेवगाव शहरात मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. या जमावाने शहर बंदचे आवाहन केल्याने त्यास शंभर टक्के प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.एस.टी. वाहतूक बंद ठेवण्यात आली. काही शाळाही सोडून देण्यात आल्या.त्यानंतर क्रांतीचौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शासनाचा निषेध व्यक्त केला. सर्व वाहतूक ठप्प असताना नेवासा-शेवगाव एस.टी. बस बसस्थानकात जात होती. तेव्हा संतप्त जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेकीत महिला बसवाहक सुलभा भुसे किरकोळ जखमी झाल्या. नंतर सकल मराठा समाजाने रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.