Wed, Jul 17, 2019 00:34होमपेज › Ahamadnagar › अकराशे विद्यार्थी इंग्रजीतून मराठीत!

अकराशे विद्यार्थी इंग्रजीतून मराठीत!

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:00PMनगर : प्रतिनिधी

खाजगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असलेल्या तब्बल अकराशे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये यंदा प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांच्या वाढत्या कलाचे हे द्योतक असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाकडून होत असलेल्या विविध सुधारणांचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागाने ही आकडेवारी जारी केली.

जिल्हा परिषदेच्या शाळांना मध्यंतरी उतरती कळा लागल्याचे चित्र होते. इंग्रजी शाळांच्या अतिक्रमणामुळे मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का घसरताना दिसत होता. छोट्याशा खेडेगावातही इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले दिसून येत होते. सुरुवातीचा झगमगाट पाहून अनेक पालकांनी आपापल्या पाल्यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेतून दाखले काढून इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतले होते. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकायला विद्यार्थी राहणार की नाही? अशी शंका उपस्थित होत होती.

गतवर्षी झालेल्या निंबोडी दुर्घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या जिल्हाभरात कमी होतेय की काय? असे वाटत होते. जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांच्या समोर येणार्‍या कारनाम्यांमुळे विद्यार्थी संख्या घटण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र यावर्षी शिक्षण विभागाने व शिक्षकांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे फळ म्हणून विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आगामी वर्षात अशाच पद्धतीने वाटचाल राहिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांना ‘अच्छे दिन’ येऊ शकतात.

शिक्षण विभागाच्या आकडेवारीत तालुक्यांचा विचार केला असता नगर तालुक्यात सर्वाधिक 299 विद्यार्थी मराठीत आले आहेत. त्याखालोखाल श्रीरामपूर तालुक्यात 143, शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या शेवगाव तालुक्यात 161, आदिवासी तालुका असलेल्या अकोल्यात 87, अध्यक्षा शालिनी विखे यांच्या राहाता तालुक्यात 79 विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात प्रवेश घेतला आहे. तर पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर या चार तालुक्यात एकही विद्यार्थ्याने इंग्रजीतून मराठी माध्यमात प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे या चार तालुक्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.