Fri, Apr 26, 2019 00:12होमपेज › Ahamadnagar › वीजबिलाची माहिती मोबाईलवर 

वीजबिलाची माहिती मोबाईलवर 

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 11:55PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 5 लाख  56 हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून, या ग्राहकांना रिडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. उर्वरित  4 लाख 9 हजार वीज ग्राहकांनीही आपापल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी पंपधारक व इतर असे एकूण  9 लाख  56 हजार 590 वीज ग्राहक आहेत. यातील  58 टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा ’एसएमएस’ पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक  1912 हा ‘एसएमएस’च्या शेवटी नमूद केला आहे.

या तपशिलाची पडताळणी करून वेळीच तक्रार करण्याची सुविधा यातून ग्राहकांना मिळते. यामुळे बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येणे शक्य  होते. तर वीजबिले तयार झाल्यानंतरही काही तासांमध्ये बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा ‘एसएमएस’ ग्राहकांना पाठविला जातो. बिलाच्या मूळ प्रतीऐवजी हा ‘एसएमएस’ दाखवूनही ग्राहकांना वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

मीटर रिडींग व बिलाचा तपशिल याशिवाय मोबाईल नोंदणीचे आणखीही काही फायदे ग्राहकांना मिळतात. नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीज पुरवठा व खंडित पुरवठ्याच्या कालावधीबाबत आगाऊ माहिती देणारा ’एसएमएस’ ग्राहकांना पाठविण्यात येतो. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीज पुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा कधी पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही ’एसएमएस’द्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते. तेंव्हा जिल्ह्यातील उर्वरित ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे तातडीने नोंदणी करून महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.