Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Ahamadnagar › दोन वर्षांत झालेल्या कामांच्या सर्व बिलांची होणार तपासणी!

दोन वर्षांत झालेल्या कामांच्या सर्व बिलांची होणार तपासणी!

Published On: Jan 30 2018 11:15PM | Last Updated: Jan 30 2018 11:05PMनगर :  प्रतिनिधी

पथदिवे घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन लिपिकाला अटक करण्यात आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे आज (दि.31) महापालिकेत जाऊन चौकशी करणार आहेत. तसेच तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे मागील दोन वर्षांतील प्रलंबित व अदा झालेल्या पथदिव्यांच्या सर्व कामांच्या बिलांची व देयकांची तपासणीही पोलिसांकडून होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

ठेकेदार सचिन लोटके, विभागप्रमुख रोहिदास सातपुते, पर्यवेक्षक बाळासाहेब सावळे, लिपिक भरत काळे या चौघांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे जबाबही यापूर्वी पोलिसांनी नोंदविले आहेत. महापालिकेत बिले कशी काढली जातात, याची माहिती ठेकेदाराने जबाबात दिलेली आहे. तसेच इतर कर्मचार्‍यांच्या चौकशीतही आर्थिक गैरव्यवहारातून ज्येष्ठता क्रम डावलून बिले कशी अदा होतात, याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. यात गेल्या 2 वर्षांतील अदा झालेली व प्रलंबित असलेली ठेकेदार लोटकेसह इतरांनी केलेल्या पथदिव्यांच्या सर्व निधीतील कामांची बिले व देयके पोलिसांकडून तपासली जाणार आहेत. त्यासाठी तपासी अधिकारी सपकाळे आज दिवसभर मनपात चौकशी करणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, विद्युत विभागातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत लिपिक काळे याने महापालिकेच्या चौकशीतच सर्व प्रकार उघड केलेला आहे. पोलिसांकडेही त्याने जबाब नोंदविलेला असून यात या घोटाळाल्यासह इतर कामांमधील गैरप्रकाराची महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाल्याचेही बोलले जात आहे.