Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Ahamadnagar › ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे; 45 लाख शेतीपंप

राज्यातील शेतीपंपांच्या वीज वापराचे ऑडिट!

Published On: Jun 05 2018 1:15AM | Last Updated: Jun 05 2018 12:07AMपारनेर : प्रतिनिधी

महावितरणकडून वीजपुरवठा करण्यात येणार्‍या राज्यातील 45 लाख शेतीपंपाच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांत स्वतंत्र ऑडिट करण्यात येणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (दि.4)राळेगणसिद्धी येथे जाहीर केले. त्यामुळे शेतीपंपाचा वीजवापर निश्‍चित होऊन वीज बिलांबाबत तक्रारी राहणार नसल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

राज्यातील शेतकर्‍यांचा वीजवापर आणि त्यांना येणार्‍या वीज बिलाबाबत प्रश्‍न उपस्थित करणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बावनकुळे यांना पाठविले होते. या पत्राची दखल घेऊन बावनकुळे यांनी सोमवारी हजारेंची राळेगणसिद्धीत भेट घेतली. 

राज्य शासनाकडून यासंदर्भात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत त्यांनी हजारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले की, शेतीपंपाचा वीजवापर निश्‍चित करण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेकडून राज्यातील सर्वच शेतीपंपांच्या वीजवापराचे येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्हानिहाय ऑडिट केले जाईल. या ऑडिटनुसार त्यानंतरच्या तीन महिन्यांत हे बिल वसूल केले जाईल. कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून, शेतीपंपाची थकबाकी 29  हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. शेतकर्‍यांकडे व्याज, दंड वगळता  18 हजार कोटी रुपये मूळ थकबाकी आहे. ऑडिटनंतर वीज बिलाबाबतच्या तक्रारी संपुष्टात येतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला जमीन देणार्‍या गावातील शेतकर्‍यांना दिवसा अखंडित वीज देण्याचे धोरण आखल्याचे ना. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकणार्‍या या योजनेला अधिक गती देण्यात येत आहे. राळेगणसिद्धी येथे या योजनेतून साकारत असलेल्या दोन मेगावॅट प्रकल्पाचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. या प्रकल्पाची आणखी तीन मेगावॅटने क्षमता वाढविण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चा व उपाययोजनांबाबत हजारे यांनी समाधान व्यक्त केले.