Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Ahamadnagar › विद्युत पंप चोरणारे रॅकेट उघडकीस

विद्युत पंप चोरणारे रॅकेट उघडकीस

Published On: Jan 21 2018 2:43AM | Last Updated: Jan 20 2018 10:32PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

तालुक्यात विहिरींवरील विद्युतपंप चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आणखी दोघांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून दोन विद्युतपंप व दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. 

घेऊन विचारपूस केली असता विद्युत पंप चोरी करून ते बाजारात विक्री  करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या तिघांकडून दोन विद्युत पंप आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गालिफ शेख, विकास सप्रे आणि वैभव कोकाटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील आढळगाव, घोडेगाव, भावडी यासह इतर भागातून विद्युतपंप चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता, चोरी गेलेल्या विद्युतपंपाचा तपास कधी लागला नाही. 

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी मात्र या प्रकरणात लक्ष घातले. खबर्‍यामार्फत माहिती काढत गालिफ शेख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतर दोन सहकार्‍यांची नावे सांगितली. तसेच त्यांच्या मदतीने विद्युतपंप चोरल्याची कबुली दिली. त्याचबरोबर दोन दुचाक्या चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यानंतर विकास सप्रे व वैभव कोकाटे यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन विद्युतपंप व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. 

पोलिस निरीक्षक  पोवार म्हणाले, या तिघांनी अजून किती विद्युतपंप चोरी केले, याबाबत तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात या तिघांखेरीज आणखी काही तरुणांचा सहभाग यामध्ये असल्याचे समोर आले आहे. त्यादृष्टीने आमचा तपास सुरू आहे. या कारवाइत पोलिस नाईक अंकुश ढवळे, प्रकाश वाघ, उत्तम राऊत, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल आजबे, संभाजी वाबळे यांनी महत्वाची भूमिका बजावली.