Wed, Apr 24, 2019 08:10होमपेज › Ahamadnagar › आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच!

आगामी महापालिका निवडणूक स्वबळावरच!

Published On: Aug 13 2018 1:17AM | Last Updated: Aug 12 2018 11:22PMनगर : प्रतिनिधी

सांगली महापालिकेचा निकाल आमच्यासाठी प्रेरणादायी असून, नागरिक भाजपाच्या पाठिशी असल्याचेच हे प्रतिक आहे. येत्या महापालिका निवडणुकीतही भाजप संपूर्ण ताकदीने उतरणार असून, सध्यातरी स्वबळावरच निवडणूक लढविणार असल्याचे खा.दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अनेक विद्यमान नगरसेवक भाजपात येण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेपासून दुरावलेले दिगंबर ढवण यांनी पत्रकार परिषदेला लावलेली हजेरी व सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे पेढा भरवून केलेले स्वागत यामुळे ढवण दाम्पत्याचा भाजप प्रवेश निश्‍चित असल्याचे चित्र आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पाटी सर्व 68 जागांवर उमेदवार देण्यासाठी सक्षम आहे. अनेक इच्छुक व सक्षम उमेदवारांसह विद्यमान नगरसेवकांचाही भाजपाकडे ओढा वाढला आहे. 7 ते 8 विद्यमान नगरसेवक येत्या काही दिवसांतच भाजपात प्रवेश करतील, असेही गांधी यांनी सांगितले. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने शिवसेना नगरसेवक मनोज दुलम यांना भाजपात घेवून शिवसेनाला पहिला धक्का दिल्यानंतर आता दिगंबर ढवण व शारदा ढवण यांच्या रुपाने दुसरा धक्का देण्याची तयारी खा.दिलीप गांधी यांनी केली आहे. ढवण यांचा भाजप प्रवेश निश्‍चित मानला जात असून, रविवारी (दि.12) खा.गांधी यांच्या पत्रकार परिषदेत ढवण यांनी हजेरी लावल्यामुळे तसेच सुवेंद्र गांधी यांनी पेढा भरवून त्यांचे स्वागत केल्यामुळे प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट आहे.

शिवसेनेचे आणखी तीन नगरसेवक गळाला?

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाने सत्ताधारी शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. मनोज दुलम यांनी प्रवेश केलेला आहे. तर दिगंबर ढवण दाम्पत्याचाही प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. यासह शिवसेनेचे उपनगरातील आणखी तीन विद्यमान नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. प्रभाग रचना प्रसिध्द झाल्यानंतर या हालचालींना वेग येणार आहे. दरम्यान, नगरसेवक गणेश भोसले, स्वप्निल शिंदे, संजय लोंढे यांचाही प्रवेश निश्‍चित झाल्याचे भाजपाच्या गोटातून सांगितले जात आहे.