Fri, Apr 26, 2019 01:23होमपेज › Ahamadnagar › काष्टीमध्ये आठ वर्षीय मुलाचा खून?

काष्टीमध्ये आठ वर्षीय मुलाचा खून?

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 10:58PMश्रीगोंदा/काष्टी : प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवारात 25 मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास उसाच्या शेतात एका आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून केला असण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली. या मुलाची ओळख पटवून आरोपी जेरबंद करण्याचे मोठे आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, काष्टी-श्रीगोंदा रस्त्यावर एका उसाच्या शेतात आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. या मुलाच्या अंगात टी शर्ट आणि पँट आढळून आली. मुलाच्या शरिरावर इतर कुठेही जखमा नसल्या तरी गळ्याभोवती काळे व्रण आढळून आले आहेत. 

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, सहाय्यक निरीक्षक नीलेश कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी त्या मुलाची चप्पल आढळून आली आहे. या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतरच  स्पष्ट होणार असले तरी या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज  आहे. 

दरम्यान, श्वानपथकाने घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरापर्यंत माग दाखविला. याचाच अर्थ हा मृतदेह वाहनातून घेऊन येऊन या ठिकाणी टाकला असावा. हा मुलगा कोण आहे, त्याचा खून कोणी केला, याबाबत पोलिसांना सखोल तपास करावा लागणार आहे. पोलिस निरीक्षक पोवार म्हणाले की, या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. दौंड आणि इतर आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात याबाबत माहिती कळविली आहे. दौंड रेल्वे पोलिस ठाण्यात एक सात वर्षीय मुलगा मिसिंग असल्याची फिर्याद दाखल आहे. त्या मुलाच्या नातेवाइकांकडे अधिक चौकशी सुरु आहे.

त्या घटनेची आठवण 

जानेवारी 2016 मध्ये याच काष्टी-श्रीगोंदा रस्त्यावर एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मात्र याबाबत पुढे काहीच तपास झाला नाही. आज या लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने 2016 मधल्या घटनेची परिसरातील रहिवाशाना आठवण झाली.