Tue, Jul 23, 2019 18:47होमपेज › Ahamadnagar › एकादशीला विद्यार्थ्यांच्या आहारात अंडे

एकादशीला विद्यार्थ्यांच्या आहारात अंडे

Published On: Jul 24 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 11:13PMअकोले : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात काल आषाढी एकादशीनिमित्त भाविक उपवास करीत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत असताना याच पवित्र दिनी अकोले तालुक्यातील केळीरुम्हणवाडी येथील आश्रमशाळेतील मुलांना आहारात चक्क अंडी खायला देण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. असाच प्रकार इतरही काही शाळांमध्ये घडला आहे. खायला दुसरे काहीच नसल्याने अनेक मुलांनी नाईलाजाने अंडी खाल्ली, तर काही माळकरी मुलांनी निरंकार उपवास करणे पसंत केले. 

याबाबत  शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारता  त्यांनी अतिशय अरेरावीत ‘मला याबाबत काहीही बोलायचे नाही’ असे सांगून काहीही माहिती देण्यास नकार दिला. राजूरच्या प्रकल्प अधिकार्‍यांनीही सदर प्रकार झाल्याचे मान्य केले. पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार समजताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंभू नेहे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, महेश झोळेकर, नगरसेवक सुरेश लोखंडे व  इतर कार्यकर्त्यांनी केळीरुम्हणवाडी येथे जाऊन मुख्याध्यापकाला याबाबत जाब विचारला, तेव्हा त्यांची चांगलीच भंबेरी उडाली.  

याबाबतची माहिती अशी की, तालुक्याच्या उत्तर भागात केळीरुम्हनवाडी येथे शासकीय आश्रमशाळा आहे. याठिकाणी कनिष्ठ महाविद्यालयही असून याठिकाणी वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांना मुंढेगाव (जि. नाशिक ) येथील मध्यवर्ती स्वयंपाक भांडारातून दररोज जेवण पुरविले जाते. नाशिक, नगर व ठाणे जिल्ह्यांतील सुमारे पन्नास आश्रमशाळांना येथूनच दररोज तयार केलेले जेवण पुरविले जाते. जेवणाबरोबरच नाश्ताही दिला जातो. काल या शाळेत नाश्त्यासाठी शिर्‍याबरोबर चक्क अंडी आली. वसतिगृहातील 200 विद्यार्थ्यांना 400 अंडी पुरविण्यात आली. आषाढी एकादशी असतानाही अंडी देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी याबाबत मुख्याध्यापक व वसतिगृह अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दोघांनीही लक्ष न देता जे दिले ते खा असे फर्मावले. दुर्गम असलेल्या या शाळेत खाण्यासाठी दुसरे काहीच नसल्याने या विद्यार्थ्यांनी नाईलाजाने अंडी खाल्‍ली.  काही माळ्करी विद्यार्थ्यांनी निरंकर उपवास धरला. ही वार्ता पसरताच अनेक सुज्ञ नागरिकांनी तालुक्यातील नेत्यांच्या कानी ही गंभीर बाब घातली. याची दखल घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाळा गाठून झाल्या प्रकारची शहनिशा केली. मुलांकडून याबाबत नेमकी माहिती घेतली. तेव्हा हा प्रकार घडल्याचे दिसून आले. शाळेच्या फलकावर आजचा आहार लिहिला होता. त्यामध्येही अंडीच लिहिलेले होते. वास्तविक आहाराचे नियोजन ठरविताना तो दिवस, त्या दिवशी काही सण आहे का, एकादशी आहे का हे पाहूनच नियोजन केले जाते. असे असताना  दुर्लक्ष व बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांना एकादशीच्या दिवशीच अंडी खावी लागली आहे.

चुकीचे एवढे भांडवल कशासाठी?

मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाक भांडारातून तीन जिल्ह्यातील पन्नास आश्रमशाळांना दररोज जेवण पुरविले जाते. आजही त्यांच्याकडूनच शिरा व अंडी नाश्त्यासाठी आली होती. सदर बाब घडली आहे. मात्र ते जाणीवपूर्वक झालेले नाही. चुकून काल अंडी आली. आपलाही उपवास चुकून मोडत नाही का? अशीच ही चूक झाली. आपण स्वत:ला पुरोगामी म्हणतो. मग या चुकीचे एवढेे भांडवल कशासाठी? 

संतोष ठुबे, प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर