शेवगाव : प्रतिनिधी
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकास गुप्तीने भोकसून ठार मारण्याच्या प्रयत्नाची घटना तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी (दि. 27) घडली असून शेवगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तालुक्यातील बोधेगाव येथील कुढेकरवस्तीत बबन किसन भवार (वय 38, रा. कुढेकरवस्ती, बोधेगाव) याने आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन दि. 27 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुनिल रामा कुढेकर (वय 30) याच्या पोटात गुप्तीने वार केला. त्यामध्ये कुढेकर यांना गंभीर दुखापत झाली.
तसेच बरगडी व तोंडावर वार करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सामरे यांच्या शेतात घडली.जखमी सुनिल कुढेकर याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्ञानदेव कुढेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बबन भवार याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत (दि. 1 सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर करीत आहेत.