Thu, Jul 18, 2019 12:40होमपेज › Ahamadnagar › प्रवेश नाकारणार्‍या शाळांवर प्रशासक!

प्रवेश नाकारणार्‍या शाळांवर प्रशासक!

Published On: Apr 12 2018 1:22AM | Last Updated: Apr 11 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 टक्के मोफत असलेल्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. ऑनलाईन सोडतीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळांनी नाकारल्यास अशा शाळांवर प्रशासक नियुक्त करण्याची कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी दिला आहे. 

वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर जास्त अर्ज आलेल्या शाळांसाठी आज ऑनलाईन सोडत काढण्यात आली. शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठीव विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थ सहाय्यित शाळांमध्ये किमान 25 टक्के जागांसाठी मोफत प्रवेश देण्यात येतात.

ऑनलाईन अर्ज भरतांना अनेक शाळांमध्ये त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या शाळांसाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत काढण्यात आली. जिल्ह्यात 25 टक्के प्रवेशाच्या 5 हजार 382 जागा असून, त्यापैकी सर्वाधिक जागा या नगर शहरातील शाळांमध्ये आहेत. पात्र असलेल्या 395 शाळांसाठी 1 हजार 296 जागांचे प्रवेश निश्चित केले  जाणार आहेत. आतापर्यंत 975 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, 259 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशासाठी 13 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

25 टक्के अंतर्गत नोंदणी केलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. असे प्रवेश नाकारल्यास शाळांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (व्यवस्थापन अधिनियम) 1976 प्रशासक नियुक्ती कार्यपद्धतीनुसार प्रशासक नियुक करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार होणारे सर्व प्रवेश पूर्ण होतील यासाठी गटशिक्षणाधिकारी मनपा, नपा, प्रशासनाधिकारी, शिक्षणप्रमुख यांना कळविण्यात आल्याचे काठमोरे म्हणाले. मोफत प्रवेश न देणार्‍या शाळांचा अहवाल गटशिक्षणाधिकार्‍यांनी तात्काळ सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यावर्षी प्रवेश प्रक्रिया जानेवारीपासून सुरु करून एप्रिलपर्यंत संपविण्याचे निर्देश होते. जिल्ह्यातील 395 शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गासाठी (प्री. केजी., एल. के. जी, यु. के. जी.) 168 जागा आहेत. तर इयत्ता पहिलीसाठी 5 हजार 214 जागा आहेत. पूर्व प्राथमिक वर्गासाठी मनपा हद्दीतील 27 शाळांमध्ये 64 जागा, राहत्यातील 31 शाळांमध्ये 40 जागा, नगरच्या 52 शाळांमध्ये 56 जागा, श्रीरामपूरच्या 25 शाळांमध्ये 8 जागा आहेत.

Tags : ahmednagar news, Education Officer Ramakant Kathamore