Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Ahamadnagar › खा. दिलीप गांधींसह चौघांवर गुन्हा दाखल करा; न्यायालयाचे आदेश

खा. दिलीप गांधींसह चौघांवर गुन्हा दाखल करा; न्यायालयाचे आदेश

Published On: Feb 24 2018 1:40AM | Last Updated: Feb 24 2018 1:40AMनगर : प्रतिनिधी

अपहरण, मारहाण, खंडणीप्रकरणी सालासार फोर्डचे संचालक गोवर्धन बिहाणी यांच्या नोव्हेंबर 2016 मधील तक्रारीनुसार भाजपचे खा. दिलीप गांधी व त्यांचे सुपुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह चौघांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास तत्काळ सीआयडीकडे वर्ग करण्याच्या सूचनाही न्या. एस. एस. शिंदे व न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने दिल्या आहेत. 

दरम्यान, आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे सादर करावा, असेही निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

डिसेंबर 2014 ते मार्च 2015 या काळात खा. दिलीप गांधी यांनी बिहाणी यांच्या फोर्ड शोरुममधून फोर्ड एन्डेव्हर कार खरेदी केली होती. त्यांना पसंतीचा क्रमांक घ्यायचा असल्याने त्यांनी उशिराने त्याचे रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर सदर गाडीत दोष असल्याच्या तक्रारी गांधी यांनी कंपनीकडे केल्या. तसेच बिहाणी यांच्याबाबतही तक्रारही त्यांनी केली. त्यानंतर 29 सप्टेंबर 2015 रोजी सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी शोरुममधील वितरण व्यवस्थापक व व्यवस्थापक असलेल्या ओस्तवाल व रसाळ यांचे अपहरण केले. तसेच शोरुममधील 10 फोर्ड इको कार, कागदपत्रांसह घेऊन गेले. त्याबदल्यात खंडणीची मागणी केली.

नंतरच्या काळात 10 पैकी 9 कार त्यांनी परत केल्या व 1 कार खा. गांधी यांची मुलगी स्वाती हिच्यासाठी ठेवून घेतली. त्यापोटी 5 लाख रुपये त्यांनी जमा केले. त्यानंतर खा. गांधी यांनी पदाचा वापर करुन बिहाणी यांच्या विरोधात मंत्र्यांकडे, आयकर व विक्रीकर विभागाकडे तक्रारी करुन त्यांना त्रास दिला. खा. गांधी यांनी पवन गांधी व इतरांकडून वारंवार फोनद्वारे बिहाणी यांना त्रास दिल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याचिकाकर्ते भूषण बिहाणी व त्यांचे वडील गोवर्धन बिहाणी हे घाबरलेले असल्याने त्यांनी याबाबत फिर्याद दिली नाही. मात्र, 10 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांनी पंतप्रधानांकडे तक्रार केली. त्याची प्रत त्यांनी पोलिस अधीक्षकांनाही दिली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. नंतर बिहाणी यांनी 21 नोव्हेंबर 2016 रोजी पुन्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला. मात्र, त्याची चौकशी होऊन तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांकडून देण्यात आला. त्यामुळे या प्रकरणी भूषण बिहाणी यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका (1286/2017) दाखल केली.

याचिकेवर सुनावणी होऊन औरंगाबाद खंडपीठाने काल खा. दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी, पवन गांधी (तिघे रा. नगर) व सचिन गायकवाड (रा. श्रीगोंदा) यांच्या विरूद्ध 21 नोव्हेंबर 2016 च्या पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनुसार 24 तासांच्या आत  फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. तसेच सदर प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांमार्फत न करता तो तात्काळ सीआयडीकडे वर्ग करण्याच्या सूचना न्यायालयाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिल्या आहेत. आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करुन पोलिसांनी त्याचा अहवाल नगरच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे सादर करावा, असे  निर्देशही औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बिहाणी यांच्या वतीने अ‍ॅड. आर. आर. मंत्री व अ‍ॅड. संचेती यांनी काम पाहिले. दरम्यान, छिंदम प्रकरणामुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या खा. गांधी यांना हायकोर्टाने दणका दिल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

गांधी, गायकवाड यांच्या याचिका फेटाळल्या!

याचिकाकर्त्यांनी नवीन गाडीच्या ऐवजी जुनीच गाडी देवून फसवणूक केल्याची व उलट आमच्या विरोधात खोटी तक्रार केल्याप्रकरणी सुवेंद्र गांधी व सचिन गायकवाड यांनी बिहाणी यांच्या विरोधात रिट याचिका दाखल केल्या होत्या. बिहाणी यांनी माझ्याकडून 25 लाख रूपये हातउसणे घेतले असल्याने खंडणीचा गुन्हा दाखल होवू शकत नाही, असा दावा गायकवाड यांनी केला होता. मात्र, खंडपीठाने बिहाणी यांची याचिका मंजूर करत गांधी व गायकवाड यांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

गुन्हा दाखल करण्यास स्थगिती नाही!

खंडपीठाने याचिकेवर निर्णय दिल्यानंतर खा. गांधी व इतरांनी अ‍ॅड. नितीन गवारे यांच्यामार्फत अर्ज दाखल करुन वरिष्ठ न्यायालयात अपिल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत द्यावी व तोपर्यंत आदेशावर कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र, खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावत, यात स्थगिती देण्यासारखे काहीच नाही, निकालात नमूद केल्यानुसार तात्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

पोलिसांवर ओढले ताशेरे

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना देताना, उच्च न्यायालयाने पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले आहेत. खटल्यातील फिर्यादी भूषण बिहाणी यांनी आपला तक्रार अर्ज दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे दिल्यानंतर त्याअनुषंगाने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा सुयोग्य व निःपक्षपातीपणाने तपास होणे आवश्यक असताना, स्थानिक पोलिस यंत्रणेने मात्र अनामिक दडपणाखाली येऊन या गुन्ह्यात कोणतेही तथ्य नसल्याचा निष्कर्ष काढला आणि वेळकाढूपणा केला.