Thu, Jun 27, 2019 04:11होमपेज › Ahamadnagar › ग्रा.पं. निवडणुकीसाठी ई-वोटिंग प्रणाली

ग्रा.पं. निवडणुकीसाठी ई-वोटिंग प्रणाली

Published On: Jun 05 2018 1:15AM | Last Updated: Jun 05 2018 12:04AMनगर : प्रतिनिधी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना पर्याय म्हणून ‘ई-वोटिंग’ प्रणाली वापरण्याचा  संकल्प राज्य निवडणूक आयोगाने केला आहे. त्यानुसार जोमात तयारी देखील सुरु केली आहे. आगामी काळात होणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी लॅपटॉप वा संगणकांचा वापर केला जाणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी देखील राज्य निवडणूक आयोग या यंत्रांचाच सर्रास वापर करत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या मतदान यंत्रांबाबत तक्रारी येऊ लागल्या आहेत. या यंत्रांव्दारे मतदानात गडबड घोटाळा होत असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला आहे.

या मतदान यंत्राला पर्याय म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ई -वोटिंग या प्रणालीचे काम हाती घेतले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत हा पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आयोगाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे. यासाठी कमी लोकसंख्या असलेली गावे निवडलेली जाणार आहेत.  या गावांतील 98 टक्के लोकांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. याबरोबरच या गावांमध्ये नेट आणि कायमचा विद्युतपुरवठ्याची सुविधा आवश्यक आहे. या सुविधा उपलब्ध असणार्‍या गावांत प्रारंभी ई-वोटिंग  प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यासाठी आयोगाकडून सॉप्टवेअर तयार केले जाणार आहे.

आगामी काळात 114 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी ‘ई-वोटिंग’प्रणालीचा वापर होण्याची शक्यता बळावली आहे. यासाठी मतदारांमध्ये  जनजागृती केली जाणार आहे. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करुन, या प्रणालीचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्‍त अविनाश सणस यांनी काल (दि.4) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितले. 

नीता कदम-देशमुख यांची निवड

या प्रणालीच्या निर्मितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक विभागातील एक उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व अव्वल कारकून असे एकूण बारा अधिकारी व कर्मचार्‍यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली आहे. यामध्ये  नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील  ग्रामपंचायत विभागाच्या अव्वल कारकून नीता कदम-देशमुख यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातून निवड झालेल्या त्या एकमेव कर्मचारी आहेत.