Thu, May 23, 2019 21:24
    ब्रेकिंग    



होमपेज › Ahamadnagar › पावसाळ्यातही टंचाईच्या झळा तीव्रच

पावसाळ्यातही टंचाईच्या झळा तीव्रच

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:16PM



नगर : प्रतिनिधी  

पावसाने दडी मारल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आजमितीस 20 गावे आणि 78 वाड्यांतील 48 हजार लोकसंख्येला पावसाळ्याच्या दिवसांत टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. पाथर्डी तालुक्यातील 12 गावांना देखील पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत. या गावांसाठी देखील टँकर सुरु करा, या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आहे. 
पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. 14 ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात सरासरी फक्‍त 218 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 274 मि.मी. पाऊस झाला होता. गेल्या वर्षी या कालावधीत जिल्ह्यातील एकाही गावात टँकर धावत नव्हता. यंदा मात्र गेल्या दीड महिन्यांपासूनच संगमनेर  तालुक्यातील 16 गावे आणि 62 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पारनेर तालुक्यातील 4 गावे आणि 16 वाड्यांत देखील हीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या सर्व गावांसाठी 22 टँकर धावत आहेत. 

गेल्या महिनाभरापासून पाऊस गायब झाला आहे. खरीप पिके पावसाअभावी माना टाकू लागले आहेत. पावसाअभावी भूजलपातळी देखील खालावू लागली आहे. ऐन पावसाळयाच्या दिवसांत पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाथर्डी तालुक्यात आजपर्यंत फक्‍त 173 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील 11 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याच तालुक्यातील करोडी या गावासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर मंजूर केला गेला आहे. शेवगाव तालुक्यातील राक्षी गावाला देखील पाणीटंचाईने ग्रासले आहे. या दोन्ही तालुक्यांतील तेरा गावांतील जनता पिण्याच्या पाण्यासाठी मोताज झाली आहे. 

पाथर्डीचे  उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी पाथर्डी तालुक्यातील चितळवाडी, अकोला, लोहसर, गिरेवाडी, मोहज देवढे, पत्र्याचा तांडा, तीनखडी, शिरापूर, निपाणी जळगाव, पिंपळगव्हाण, मालेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील राक्षी अशा एकूण 12 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांसाठी टँकर सुरु करावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी व्दिवेदी कोणता  निर्णय घेतात, याकडे या टंचाईग्रस्त गावांनील जनतेचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, गुरुवारी (दि.16) जिल्हाभरात पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभर पाऊस सुरुच होता. पाथर्डी तालुक्यात सरासरी 54 तर शेवगाव तालुक्यात 57 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने भूजलपातळी  वाढली का याचा शोध घेतला जाईल त्यानंतरच टँकर मंजूर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या दोन तालुक्यांतील जनतेला पाण्यासाठीच भटकंती करावी लागणार आहे.