Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Ahamadnagar › परीक्षेच्या काळात वीजपुरवठा बंद

परीक्षेच्या काळात वीजपुरवठा बंद

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 10:51PMभावीनिमगावः वार्ताहर

शेवगाव तालुक्यातील सुलतानपूर बु. (मठाचीवाडी) भागातील वाड्या वस्त्यांवर होणारा सिंगल फेजचा वीजपुरवठा महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे येथे काळोख पसरला आहे. नुकतेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले आहेत. परीक्षा सुरु झाली असताना अभ्यासाकडे लक्ष देणार्‍या मठाचीवाडीतील तरुणांना वीजपुरवठा खंडित झाल्याने मात्र मोठा फटका बसत आहे. ग्रामस्थांनी अधिकार्‍यांना भेटून यासंबंधी लक्ष घालण्याची मागणी अनेकवेळा केली आहे. तरीही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.

मठाचीवाडी गावठाण भागात होणारा अक्षय प्रकाश योजनेचा वीजपुरवठा सुरळीत आहे. मात्र, वाघ वस्ती,पवार वस्ती, बोरुडे वस्ती, जगदाळे वस्ती आदी ठिकाणी होणार्‍या सिंगल फेजचा वीजपुरवठा बंद आहे. संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली असता, येथील वीजपुरवठ्यासाठी अंत्रे येथील उपकेंद्रात पोल खराब झाल्यामुळे व पॉवर ट्रान्स्फार्मर नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे असे सांगण्यात आहे. त्यामुळे सिंगल फेजचा वेळापत्रकानुसार सहा ते आठ तास मिळणारा वीजपुरवठा मागील महिनाभरापासून बंद झाला आहे. सध्या रात्री 10.30 ते सकाळी 8.30 असा वीजपुरवठा होत असल्याने ऐन परीक्षेचा ताण असताना याचा काळात सायंकाळी वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांकडून असंतोष व्यक्त होत आहे.

वीजवितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून दुरुस्तीचे काम सुरु असले तरी विद्यार्थ्यांचे मात्र यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. येत्या दोन तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रामजी शिदोरे,अशोक वाघ यांनी दिला आहे.

दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

येथील वीजपुरवठ्यासाठी अंत्रे येथील उपकेंद्रात पोल खराब झाल्यामुळे व विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून रविवार सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. - पियुष पाडवी, सहाय्यक अभियंता, भातकुडगाव कक्ष