Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Ahamadnagar › दूध दर घसरल्याने गायींच्या किंमती निम्म्यावर!

दूध दर घसरल्याने गायींच्या किंमती निम्म्यावर!

Published On: May 24 2018 1:30AM | Last Updated: May 23 2018 11:11PMढोरजळगाव : बाळासाहेब बर्गे

गेल्या काही काळापासून दुधाचे दर उतरल्याने दुभत्या गायींच्या किंमतीतही निम्म्याने घट निर्माण झाल्याने दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत.

शेतीला पूरक आणि जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते.गेल्या काही काळापूर्वी या व्यवसायाला चांगली भरभराटही आली होती. मात्र, नंतर या व्यवसायाने अनेक गटांगळ्या खाल्ल्या, त्या आजही खातोय. मध्यंतरीच्या काळात शेतीला पर्यायी व्यवसाय म्हणून या व्यवसायाने चांगली उचल खाल्ली होती. त्यानंतर शासनाने दूध पावडरची निर्यातबंदी केली आणि या व्यवसायाला अवकळा आली ती आजही कायम आहे. यामुळे दुभत्या गायींच्या किंमतीही कमालीच्या कमी झाल्या.

या जनावरांना लागणार्‍या चार्‍याचे जसजसे दुर्भिक्ष जाणवू लागले,तसतसे शेतकरी जनावरे दावणीच्या बाहेर काढू लागली. आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने चाराटंचाई डोके वर काढून जनावरांच्या मुळावर आली.याचाच परिपाक म्हणून यंदा वाड्याचे भावही कमी झाले नाहीत. सरकी पेंडही बिगर पाण्याचीच किंमतीने फुगली. या सर्व महागलेल्या चार्‍यामुळे जनावरे जगविणे शेतकर्‍यांना मुश्कील होऊन बसले. परिणामी शेकडो जनावरे बाजारात दिसू लागली. याचा विपरीत परिणाम जनावरांच्या किंमतींवर झाला. 80 हजार रुपये किंमत असणारी गाय आज थेट 40 ते 50 हजारांत विकली जाऊ लागली आहे. लाखमोलाची जनावरे आज कवडीमोल भावात विकली जाऊ लागली आहेत. एकट्या दुधाच्या भावाने आज शेतकर्‍यांवर ही वेळ आणली आहे.

मध्यंतरीच्या काही काळापुरता दुधाला चांगला भाव मिळत होता. जवळपास 27 ते 28 रुपये मिळणार्‍या भावाने आज एकदम 18 आणि 19 रुपयांवर उडी मारली आहे. गायींवर होणारा खर्च आणि त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने आता हा व्यवसाय एकदम डबघाईला आला आहे.राज्यात दूध दरासाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारे आंदोलने करून शेतकरी शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मात्र, शासनाच्या कानावराची माशीदेखील उठताना दिसत नाही. आणखी काही काळ असाच राहिला तर छोट्या शेतकर्‍यांना आत्महत्येशिवाय दुसरा काहीच पर्याय उरणार नाही.शासनाने यावर काहीतरी पर्याय काढून दुधाच्या दराचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी दूध उत्पादक करीत आहेत.