Mon, May 20, 2019 20:27होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्र्यांमुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब! : शिवसेना 

मुख्यमंत्र्यांमुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब! : शिवसेना 

Published On: Jan 31 2018 3:53PM | Last Updated: Jan 31 2018 3:53PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बेछूट आरोपाद्वारे महापौर व शिवसेनेची बदनामी केली जात आहे. या निव्वळ चोराच्या उलट्या बोंबा असून शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच हा गुन्हा दाखल झाल्याचा दावा शिवसेनेने पत्रकार परिषदेत केला आहे. मुख्यमंत्र्यांमुळेच गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचा गौप्यस्फोट करून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी भाजपाच्या एका आमदाराने मुंबईत ठाण मांडले होते असा आरोपही शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केला.

महापालिकेतील पथदिवे घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापौर कार्यालय व तेथील कर्मचार्‍यावर आरोप केले जात आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा असून स्वत:चे पाप झाकण्यासाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी बेछूट आरोप केले जात आहेत. आम्ही या प्रकरणी खुल्या व्यासपीठावर येण्यास तयार आहोत. तेथे विरोधकांचे सगळेच घोटाळे बाहेर काढू. प्रभाग १ व २८ मधील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नार्को टेस्ट करावी. या संपूर्ण घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही सभागृह नेते गणेश कवडे, नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम यांनी केली. दरम्यान, पोलिस चौकशीत सगळे सत्य बाहेर येईलच. महापौर कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देवकर हे अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचेही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.