Mon, May 20, 2019 10:47होमपेज › Ahamadnagar › दोन भाच्यांसह मामीचा पाण्यात बुडून मृत्यू

दोन भाच्यांसह मामीचा पाण्यात बुडून मृत्यू

Published On: May 07 2018 2:00AM | Last Updated: May 07 2018 12:52AMबेलापूर : प्रतिनिधी

बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत साठलेल्या पाण्यात म्हशी पाणी पाजण्यासाठी गेलेल्या मामीसह दोन अल्पवयीन भाच्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना श्रीरामपूर तालुक्यातील वळदगावात घडली. 

कविता गणेश खंडागळे (26 रा. वळदगाव), शुभम दादासाहेब डुक्रे (12) व ओंकार दादासाहेब डुक्रे(10, दोघेही रा. शिरोली ता. जुन्नर) अशी मयतांची नावे आहेत. 

याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी की, वळदगाव शिवारात खाणीच्या परिसरात गणेश खंडागळे यांचे कुटुंब राहते. त्यांच्याकडे आठ दिवसांपूर्वी शिरोली (ता. जुन्नर, जिल्हा पुणे) येथील भाचे शुभम व ओंकार हे उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी आले होते. गणेश खंडागळे यांच्या पत्नी कविता गणेश खंडागळे या काल रविवारी  दुपारी म्हशी पाणी पाजायला घेऊन गेल्या. त्यांच्या सोबत भाचे शुभम व ओंकार तसेच कविता यांची दहा वर्षांची मुलगीही गेली होती. 

उन्हाची तिव्रता जास्त असल्याने म्हशी पाण्यात गेल्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी हे तिघेही पाण्यात गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले असावेत, असा अंदाज आहे. हा प्रसंग सोबत असणार्‍या मुलीने पाहिल्यानंतर ती घरी गेली व घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. घराकडील मंडळीही तात्काळ आले. मात्र तोपर्यंत मामींसह भाचे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता.