होमपेज › Ahamadnagar › आंदोलनावर ड्रोनची नजर!

आंदोलनावर ड्रोनची नजर!

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMनगर : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 9) राज्यभर चक्काजाम आंदोलन होत आहे. नगर जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनावर ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मात्र, एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.मराठा संघटनांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसे निवेदनही सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहे.

पोलिस प्रशासनाने दक्षता म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व आंदोलनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. बंदोबस्तासाठी दीडशे अधिकारी, दोन हजार पोलिस कर्मचारी, 900 होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या राहणार आहेत. 5 दंगल नियंत्रण पथके, 3 शीघ्र कृती दले व 1 राज्य राखीव पोलिस दलाचे पथक राखीव राहणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. सर्व पोलिस ठाण्यांना योग्य दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांकडून एसटी बसेस टार्गेट करून दगडफेक केली जाते. त्यामुळे दक्षता म्हणून नगर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी घेतला आहे. तसे जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुखांना कळविण्यात आले आहे. डेपोच्या प्रवेशद्वारावर पोलिस कर्मचारी व महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त राहणार आहेत. इतर जिल्ह्यातील बसेसही गुरुवारी (दि.9) नगरला आणू नयेत, असे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी नगरला बसेस आणणार्‍या इतर आगारांना कळविले आहे. 

महाविद्यालये बंद

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली नगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये व संस्था गुरुवारी (दि. 9) बंद राहणार आहेत. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक शाळाही बंद राहतील.