Mon, Jul 22, 2019 13:13होमपेज › Ahamadnagar › पुरावे द्या, कारवाई करू : केसरकर

पुरावे द्या, कारवाई करू : केसरकर

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:25AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर झालेली दगडफेक, धक्काबुक्की प्रकरणातील आरोपींविरुद्ध पुरावे द्या. पुरावे दिल्यास संबंधितांविरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल, असे सांगून  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांकडेच केडगाव दगडफेक व वाहनांची तोडफोड केल्याचे पुरावे मागितले. 

ना. केसरकर यांनी काल (दि. 25) सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात केडगाव हत्याकांड, एसपी कार्यालय हल्ला प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले की, केडगाव येथील दगडफेक प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पोलिस प्रशासनावर कोणाचाही दबाव नाही. पोलिसांवर नेमकी कोणी दगडफेक केली, धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग अथवा इतर कायदेशीर पुरावे नाहीत. पुरावे मिळाल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तुमच्याकडे पुरावे असल्यास तुम्हीच मला तेे द्या, मी लगेच कारवाई करण्याचे आदेश देतो, असे म्हणून पोलिस अधिकार्‍यांवरील दगडफेक, त्यांना झालेली धक्काबुक्की, शिवीगाळीचे पुरावे त्यांनी पत्रकारांकडे मागितले.

मी शिवसैनिक म्हणून नव्हे, तर येथे गृहराज्यमंत्री म्हणून आलेलो आहे. कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता कारवाई करण्यात येईल. नगरची गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचे काम सध्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड व पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरण गंभीर स्वरुपाचे आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे, असेही ते म्हणाले.

‘शिवसैनिकांची नॅचरल रिअ‍ॅक्शन’

केडगावला दुहेरी जे हत्याकांड घडले, त्यानंतर संताप व्यक्त होणे साहजिकच आहे. ती शिवसैनिकांची नॅचरल रिअ‍ॅक्शन होती, असे म्हणून सुरुवातीला गृहराज्यमंत्री केसरकर यांनी केडगावमध्ये पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचे एकप्रकारे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तात्काळ बाजू सावरत या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.