Sun, May 26, 2019 16:57होमपेज › Ahamadnagar › तपास यंत्रणेची लागली कसोटी

तपास यंत्रणेची लागली कसोटी

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:22AMनगर : गणेश शेंडगे

केडगावातील दुहेरी हत्याकांड, त्यानंतर आक्रमक होऊन जमावाने केलेली दगडफेक, पोलिस अधिकार्‍यांना शिवीगाळ, रात्री एसपी कार्यालयावर हल्ला करून चौकशीसाठी आणलेल्यांना पळविणे, कोठडीतील नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू या गेल्या पंधरा दिवसांपासून घडलेल्या घटनाक्रमामुळे पोलिस यंत्रणा, राजकीय नेते व कार्यकर्त्यांची झोप उडाली आहे. गुन्हेगारी क्षेत्रात नगर बदनाम होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना तपास यंत्रणेसमोर सत्य शोधून खर्‍या दोषींचा शोध लावून, त्यांच्याविरुद्ध पुराव्यांची साखळी तयार करण्याचे आव्हान आहे. ही बाब तपास यंत्रणेची कसोटी पाहणारी ठरली आहे.

राजकीय वादातून केडगावात दोन शिवसैनिकांनी निर्घृण हत्या झाली. या दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिक आक्रमक होणे साहजिकच होते. परंतु, सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याऐवजी दुकानांची तोडफोड झाली. पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दगडफेकीचा सामना करावा लागला. सरकारी वाहनांचे नुकसान झाले. अनेक तास उलटूनही मृतदेह ताब्यात घेतले जात नसल्याने राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना चौकशीकामी पोलिस अधीक्षक इमारतीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. चौकशीसाठी नेले नाही, तर अटक केल्याची चर्चा पसरून त्यांच्या समर्थकांनी एसपी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश केला. यावेळी महिला पोलिसांनाही धक्काबुक्की करून खाली पाडले. एखाद्या गुन्हेगारी चित्रपटास लाजविल, अशा पद्धतीने एलसीबीच्या कार्यालयातून आ. जगताप यांना खांद्यावर उचलून नेले गेले. हा प्रकार पोलिस दलाची मान शरमेने खाली घालणारा होता. परिणामी चार तास केडगावात शिव्यांची लाखोली सहन करणार्‍या पोलिसांना आक्रमक व्हावे लागले. बळाचा वापर करून 22 जणांची धरपकड करावी लागली. 

केडगाव दुहेरी हत्याकांड व पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणामुळे नगरच्या वाढत्या गुन्हेगारीला पोलिस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागला. ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, त्यांच्याविरुद्ध पुरावे तयार करण्याच्या कामाला मदत करण्याऐवजी तेच किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, यावर सोशल मीडियावर चर्चा झडू लागल्या. परंतु, आरोपातून प्रश्‍न सुटत नसतात. न्यायालय आरोप मानत नाही. जोपर्यंत खर्‍या दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती संपुष्टात येत नाही. परिणामी अपर पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन एसआयटी नियुक्त करण्यात आल्या. तपासातील तज्ज्ञ अधिकार्‍यांची त्यात नियुक्त करण्यात आली.

केडगाव येथील दुहेरी हत्याकांड व एसपी कार्यालयातील हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू झाले. याचवेळी केडगावात पोलिसांवर दगडफेक करणार्‍या शिवसैनिकांना अटक केली जात नव्हती. एकाला एक न्याय व दुसर्‍याला वेगळा न्याय, या भावनेतून पोलिस यंत्रणेवर आरोप होऊ लागले. आरोपात तथ्यही होते. यामागे कुठलातरी दबाव असू शकतो. पण, एका बाजूचे दोन आमदार, नगरसेवक व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक होत असताना, दुसर्‍या बाजूचे आरोपी खुलेआम फिरणे न्याय्य नाही. विशेष म्हणजे पोलिसांवरच दगडफेक, धक्काबुक्की झालेली असताना पोलिस शांत राहणे संशयाला जागा करून देणारे होते. म्हणून पोलिसांच्या निःपक्षपातीपणावर संशय व्यक्त होत होता. 

दुसरीकडे नगरची परिस्थिती खूपच बिघडल्याचा आरोप सुरू होता. अशा परिस्थितीत दोन गुन्ह्यांतील पुरावे तयार करण्याचे काम सुरू होते. हे होत असतानाच बेकायदा फटाके बाळगल्याच्या गुन्ह्यात वर्ग केलेल्या नगरसेवक कैलास गिरवले यांची प्रकृती पोलिस कोठडीत असताना ढासळली. त्यांना पुण्यातील ससून रूग्णालयात हलविले. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमुळेच गिरवले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक व त्यांच्या समर्थकांकडून होऊ लागला. गुन्हे शाखेतील अधिकारी व काही कर्मचार्‍यांच्या मारहाणीतून हा मृत्यू झाल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली. ‘सीआयडी’ चौकशी सुरू झाल्यानंतर अंत्यविधी झाला. अजूनही नातेवाईक पोलिसांवर तक्रारी करीत आहेत. उत्तरिय तपासणीच्या प्राथमिक अहवालात हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आलेला आहे. एकीककडे ‘सीआयडी’ चौकशी, मारहाणीचा आरोप; अशा कठिण व मनोबल खचण्याच्या परिस्थितीत पोलिसांकडून केडगाव दुहेरी हत्याकांड, एसपी कार्यालय हल्ला प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

मारहाणीच्या तक्रारीत तथ्य निघाल्यास ‘सीआयडी’च्या कारवाईची भीती पोलिसांना आहे. त्या भीतीत संवेदनशील गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तपास सुरू असताना नगरसेवक गिरवले यांच्या मृत्यूत दोष आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. राजकीय नेते नगरला येतील व जातील. आरोप होत राहतील. पण त्यातून नगरची परिस्थिती सुधारू शकेल का, या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही. न्यायालय तोंडी आरोपांवर खटला चालवत नाही. तेथे पुरावे चालतात. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत स्थानिक पोलिस व ‘सीआयडी’चे अधिकारी पुरावे गोळा करीत आहेत. केडगावचे दुहेरी सिनेस्टाईल हत्याकांड अनेकांसमोर झालेले आहे. पोलिस यंत्रणेवर आरोप करणार्‍यांतील कोणीही साक्षीदार म्हणून माहिती देण्यास पुढे यायला तयार नाही. त्यामुळे एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवून नाव गोपनीय ठेवण्याचे आश्‍वासन देण्यात आलेले आहे.

तरीही साक्षीदार पुढे येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नगरची ही परिस्थिती तपास यंत्रणेची कसोटी घेणारी ठरली आहे. या कसोटीत तपास यंत्रणेने खर्‍या आरोपींविरुद्ध पुरावे तयार करून गुन्हा सिद्ध होईल, इतपत पुराव्यांची साखळी तयार करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले, तर नगरची गुन्हेगारी नियंत्रणात येईल. नाहीतर आरोपांच्या फैरी झाडून तपास यंत्रणेवर दबाव टाकून दिशा भरकटविल्यास, तसेच खरी माहिती असणार्‍यांनी ती तपास यंत्रणेला देण्याऐवजी दडविल्यास, परिस्थिती कधीच सुधरू शकत नाही. खरे गुन्हेगार मोकाट फिरतील अन् हेच कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला अपेक्षित आहे.