Fri, Jul 19, 2019 01:44होमपेज › Ahamadnagar › कोतकर दाम्पत्यासह औदुंबर खुनाच्या कटात!

कोतकर दाम्पत्यासह औदुंबर खुनाच्या कटात!

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 10:27PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडात दोषारोपपत्र दाखल झालेल्यांसह माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, त्यांचे पती माजी महापौर संदीप कोतकर व औदुंबर बाळासाहेब कोतकर या आणखी तिघांचा खुनाच्या कटातील सहभाग तपासातून उघड झाला आहे. त्यांना अटक करून आणखी पुरावे गोळा करून संबंधिताविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ‘सीआयडी’ने शुक्रवारी (दि. 6) न्यायालयात चार्जशीट दाखल करताना ठेवली आहे.

मूळ फिर्यादीत आरोपी म्हणून उल्लेख केलेल्या मात्र अजून फरार असलेले 21 जण व अटक असतानाही सबळ पुरावा न मिळाल्याने दोषारोपपत्र ठेवू न शकलेल्या आ. संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर हे दोघे असे एकूण 23 जणांविरुद्ध सबळ पुरावा मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्याची तजवीज ठेवली आहे. मात्र, या 23 जणांविरुद्ध अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. यात तीन आमदारांचा समावेश आहे.  परंतु, गुन्ह्यात आरोपी म्हणून निष्पन्न झालेल्या व फरार असलेल्या सुवर्णा कोतकर, नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संदीप कोतकर व औदुंबर बाळासाहेब कोतकर या कटातील सहभाग असलेल्या तिघांना ‘सीआयडी’कडून अटक केली जाईल. त्यानंतर अधिक विचारपूस करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे, असे चार्जशीटमध्ये म्हटलेले आहे.  

तपासातून निष्पन्न झालेला दोषारोपपत्रातील थोडक्यात घटनाक्रम असाः केडगावातील पोटनिवडणुकीत पराजित झालेल्या गटाचे संजय कोतकर यांनी 7 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रवींद्र खोल्लम याला फोन कॉल केला होता. त्या संभाषणात खोल्लम यास शिवीगाळ, धमकी देण्यात आली. खोल्लम याने भानुदास महादेव कोतकर ऊर्फ बी. एम. व सुवर्णा कोतकर या दोघांना फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर कोतकर याने खोल्लम याला त्याच्या कार्यालयात बोलावून घेत भ्रमणध्वनीवरील कॉलची क्‍लिप ऐकली. त्यातील हकीकत औदुंबर कोतकर याला सांगितली. औदुंबर याने खोल्लम व बी. एम. कोतकर याला सुवर्णा कोतकर हिच्या घरी बोलावून घेतले. घरी गेल्यानंतर सर्व एकीकत सांगून सुवर्णा हिला त्याच्यातील संभाषण ऐकविण्यात आले. त्यानंतर तिने जामिनावर बाहेर असलेले सासरे भानुदास एकनाथ कोतकर व कारागृहात कैदी असलेल्या संदीप कोतकर याला फोन करून माहिती सांगितली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन गुन्हेगारी कट रचला. त्यावेळी सुवर्णा कोतकर, बी. एम. कोतकर, रवींद्र खोल्लम, विशाल कोतकर, औदुंबर कोतकर हे एकाच छताखाली होते, असे मोबाईल टॉवर लोकेशनवरून स्पष्ट होते, असा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे. 
विशाल कोतकर याने संदीप गुंजाळ ऊर्फ डोळश्या याला फोन करून कटात सामील करून घेतले. विशाल याने केलेल्या फोननंतर गुंजाळ हा दोन गावठी कट्टे व गुप्ती अशी शस्त्रे सोबत घेऊन खोल्लम याच्या घराकडे गेला. विशाल याने संदीप गुंजाळ तेथे गेल्याची खात्री केली. संदीप गिर्‍हे व महावीर ऊर्फ पप्पू मोकळे हे तेथे आले व पाहणी करीत होते. त्यानंतर खोल्लम यास संजय कोतकर हे फोन करून म्हणाले की, ‘मंदिराजवळ येऊन थांब. मी आलोच तिथे भेटायला.’ काही वेळात संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे आले व काही वेळातच या दोघांची हत्या करण्यात आली.

..असे घडले घटनास्थळी

संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे एकाच दुचाकीवरून खोल्लम याच्या घराजवळ आले. तेथे आल्यानंतर संदीप गुंजाळ याने त्याच्या जवळील गावठी कट्टा काढून संजय कोतकर याच्या छातीवर गोळ्या घातल्या. त्यावेळी वसंत ठुबे हे पळू लागले. गुंजाळ याने पाठलाग करून त्यांच्या हनुवटीच्या खाली व छातीत गोळ्या घातल्या. त्यानंतर गुंजाळ याने त्याच्याकडील गुप्तीने ठुबे यांचा गळा कापला. पुन्हा तो संजय कोतकर यांच्याकडे आला. त्यावेळी कोतकर हे फोनवर बोलत होते. हे पाहून गुंजाळने गुप्तीने त्यांचा गळा कापला. या दोघांचा खून करून तो साथीदार आरोपी महावीर ऊर्फ पप्पू मोकळे व संदीप ऊर्फ जॉन्टी गिर्‍हे यांच्यासह तेथून पळाला.