Wed, Jan 16, 2019 15:32होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे दुहेरी हत्याकांड प्रकरण; जामखेड बंद

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे दुहेरी हत्याकांड प्रकरण; जामखेड बंद

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:53PMजामखेड : प्रतिनिधी

दोन युवकांच्या हत्येच्या निषेधार्थ जामखेड शहरातील व्यापारी, नागरिकांनी रविवारी कडकडीत बंद पाळला. आज देखील बंद पाळण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्ताने जामखेडला पोलिस छावणीचे रुप आले असून, नागरिकांमध्ये भिती आहे.

जामखेड-बीड रस्त्यावर सोमा काळे याच्या चहाच्या दुकानासमोर योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात यांच्यासह त्यांचे काही मित्र दि. 28 रोजी सायंकाळी चहा घेत असताना एका मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात तिघांनी योगेश व राकेश यांच्यावर गावठी कट्ट्यातून 9 गोळ्या झाडल्या. त्यामुळे योगश व राकेश दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जामखेड शहरातील वातावरण तंग झाले आहे.

योगेश व राकेश हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांच्या मारेकर्‍यांना तात्काह अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली आहे. आरोपींना अटक होईपर्यंत जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार काल शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व दुकाने, बाजारपेठ बंद होती. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.