Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Ahamadnagar › केडगाव हत्याकांडातील गिर्‍हे, मोकळे जेरबंद

केडगाव हत्याकांडातील गिर्‍हे, मोकळे जेरबंद

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 11:26PMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात सहभागी असलेले आरोपी संदीप गिर्‍हे व महावीर मोकळे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता  सात झाली आहे.

केडगाव येथे मनपा पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची 7 एप्रिल रोजी गोळ्या घालून व गुप्तीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील संजय कोतकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा त्याच दिवशी पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्यास नंतर कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याने कोठडीत दिलेल्या जबाबावरून प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्या आरोपींची नावे निष्पन्न झाली होती.

त्यामध्ये संदीप बाळासाहेब गिर्‍हे (वय30, रा. शाहूनगर, केडगाव), महावीर उर्फ पप्पू रमेश मोकळे (वय28, रा. शाहूनगर, केडगाव) आणि संदीप गिर्‍हे याचा मित्र (नाव माहीत नाही) यांचा समावेश आहे. यातील मोकळे याने वसंत ठुबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सदरची नावे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दोन वेगवेगळी पथके स्थापन करून ती या आरोपींच्या शोधार्थ ठिकठिकाणी रवाना केली होती. दरम्यान पो.नि. पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी संदीप गिर्‍हे यास शिरूर (जि.पुणे) येथून तर भगवान मोकळे यास शाहूनगर (केडगाव) येथून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली

दरम्यान, यापूर्वी या गुन्ह्यात प्रत्यक्ष घटनेत सहभाग असलेला संदीप गुंजाळ, त्याला गावठी कट्टा पुरविणारा बाबासाहेब केदार याच्यासह आ. संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर व भानुदास महादेव उर्फ बी.एम. कोतकर यांना अटक करण्यात आलेली आहे. हे सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहे. या दोन आरोपींच्या अटकेमुळे हत्याकांडातील आरोपींची संख्या आता सातवर पोहचली आहे. दरम्यान, हत्याकांडात प्रत्यक्ष सहभाग असलेला संदीप गिर्‍हे याच्या मित्राचे नाव निष्पन्न करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असून, गिर्‍हेच्या अटकेमुळे तोही लवकर पकडला जाईल, असा पोलिसांना विश्‍वास आहे.  

Tags : Ahmadnagar, Double, murder, case,  Kedgaon