Thu, Jun 27, 2019 00:24होमपेज › Ahamadnagar › ‘डबल मर्डर’प्रकरणी आरोपीस जन्मठेप

‘डबल मर्डर’प्रकरणी आरोपीस जन्मठेप

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 10:49PMनगर : प्रतिनिधी

40 वर्षीय पत्नी व 12 वर्षीय मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून त्यांना ठार मारणार्‍या आरोपी दादा मारुती गिते (वय 42, रा. थेरवडी, ता. कर्जत) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. डब्ल्यू. हुड यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातार्फे सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी काम पाहिले.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, आरोपी दादा गिते याचा विवाह सुनीता हिच्यासोबत वीस वर्षांपूर्वी झाला. त्यांना अमोल व शुभम अशी दोन मुले झाली. आरोपीस वडिलोपार्जित शेती होती. मात्र आरोपी व घरातील सदस्य ही शेती थोडी-थोडी करून विकत होते. आता थोडीच जमीन शिल्लक राहिली असून, घरखर्चासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी सासरचे लोक सुनिताकडे करत होते. त्यासाठी तिचा छळही करत. परंतु माहेरची परिस्थिती ठीक नसल्याने सुनीता पैसे आणू शकत नव्हती.

सासरला छळ होत असल्याचे सुनीताने माहेरच्या नातेवाईकांना सांगितलेले होते. आरोपी व सासरच्यांनी जमीन विकू नये यासाठी सुनीताने 2003 साली कर्जतच्या दिवाणी न्यायालयात मनाई हुकुमाचा दावा दाखल केला होता. यावरूनही सुनीताला सासरच्या लोकांकडून त्रास होत होता. 22 मार्च 2016 रोजी मुलगा अमोल याची दहावीची परीक्षा संपली. त्यावेळी मयत सुनीताचा भाऊ परशुराम ज्ञानोबा लटपटे (रा. वावी, ता. आष्टी, जिल्हा बीड) हा सुनीता, अमोल व शुभम यांना भेटण्यासाठी गेला असता सुनीताने त्याला त्रास होत असल्याचे सांगितले. त्यावेळी परशुराम याने भाचा अमोलला त्याच्यासोबत नेले.

10 एप्रिल रात्री एकच्या सुमारास आरोपीने कौटुंबिक वादातून तसेच जमीन विकण्यास न्यायालयातून मनाई हुकूम आल्याच्या रागातून कुर्‍हाडीच्या तुंब्याने पत्नी सुनीताच्या डोक्यात दोन जोराचे घाव घातले. त्यावेळी सुनीता ओरडली. त्यामुळे शेजारीच झोपलेला मुलगा शुभम हा जागा झाल्याचे आरोपीला वाटले. तो घडलेला प्रकार सर्वांना सांगेल या भीतीने शुभमच्या डोक्यात त्याच कुर्‍हाडीने तीन घाव घातले. पत्नी व मुलाचे रक्त आरोपीच्या कपड्यावर उडाले. दोघांची हालचाल बंद झाल्यानंतर आरोपीने कुर्‍हाड व रक्ताचे कपडे घराशेजारील जागेत लपवून ठेवले. आरोपीने आई वडिलांना प्रकार सांगितल्यानंतर आरोपी व त्याच्या आई वडिलांनी पोबारा केला.

बहिणीच्या मृत्यूची माहिती कळल्यानंतर भाऊ परशुराम याने कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी केला. सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, आरोपीचा दुसरा मुलगा डॉ. पवार, डॉ, यादव व भूमी अभिलेख कार्यालयाचे लिपिक श्रीराम बोरुडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने याप्रकरणी न्यायालयाने भादंवि 302 नुसार दोषी धरून शिक्षा सुनावली.