Tue, Mar 26, 2019 11:54होमपेज › Ahamadnagar › कागदपत्रे तपासूनच सह्या करा!

कागदपत्रे तपासूनच सह्या करा!

Published On: Jan 30 2018 11:15PM | Last Updated: Jan 30 2018 11:15PMनगर :  प्रतिनिधी

पथदिवे घोटाळा प्रकरणात आयुक्‍तांवरच फिर्याद देण्याची नामुष्की ओढावल्यानंतर, या प्रकरणात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळाले नसल्याची खंत आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी महापौरांच्या उपस्थितीत व्यक्‍त केली. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी येत्या दोन दिवसांत निर्णय घेतले जातील. पदाधिकारी, नगरसेवकांनी कितीही फोन केले तरी अधिकारी, कर्मचार्‍यांनी कामे व कागदपत्रे तपासूनच सह्या कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

दरम्यान, वर्ग 1 व 2 च्या रिक्‍त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, असे निर्देश महापौर सुरेखा कदम यांनी दिले आहेत. गेल्या महिनाभरापासून प्रशासकीय कामकाजाची विस्कटलेली घडी व प्रशासकीय स्तरावर आलेली उदासीनता या संदर्भात महापौर कदम यांच्या उपस्थितीत अधिकारी-पदाधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक काल (दि.30) पार पडली. यावेळी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, सभागृह नेते गणेश कवडे, स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव, महिला बालकल्याणच्या सभापती सारिका भुतकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे आदींसह अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

विविध विभागांच्या कामाचा महापौरांनी आढावा घेतला. बांधकाम विभागात कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने अडथळे येत आहेत. अभियंत्यांची संख्याही नगण्य असल्याने विकामकामांचे प्रस्ताव व इतर कामांमध्ये विलंब होतो. त्यामुळे वर्ग 1 व 2 मधील रिक्‍त जागा तात्काळ भराव्यात असे आदेश महापौरांनी दिले. आस्थापना खर्चात जी वाढ दर्शविण्यात आली आहे, त्याची माहिती सादर करावी. लेखाधिकारी, लेखापरीक्षक, आस्थापना प्रमुख, सहाय्यक आयुक्‍त यांनी पुणे महापालिकेत जाऊन आस्थापना खर्चावर कसा तोडगा काढण्यात आला, याची माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. विद्युत विभागात तातडीने दोन अभियंत्यांची मानधनावर नियुक्‍ती करावी व बांधकाम, पाणीपुरवठामधील अभियंत्यांनी त्यांना सहाय्य करावे, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

आयुक्‍त मंगळे यांनी सूचना देताना प्रत्येक विभागप्रमुखांनी जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. नगरसेवक असो किंवा पदाधिकारी, जो पर्यंत तुमची खात्री होत नाही, कामांची पाहणी होत नाही, तो पर्यंत सह्या करु नयेत. घाईगडबडीत प्रस्तावांवर सह्या करु नयेत. आपली जबाबदारी ओळखून काम करावे, अशा सूचना देतांनाच हलगर्जीपणा करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी दिली आहे.