Wed, Feb 20, 2019 13:12होमपेज › Ahamadnagar › आर्थिक नैराश्यातून डॉक्टरची आत्महत्या

आर्थिक नैराश्यातून डॉक्टरची आत्महत्या

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 06 2018 12:25AMनगर : प्रतिनिधी

शहरातील फाटके हॉस्पिटल येथील भूलतज्ज्ञ डॉ. महेश राऊत (वय 41) यांनी आर्थिक नैराश्यातून इंजेक्शन घेऊन हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केली. काल (दि. 5) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, फाटके हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी दवाखान्यातील कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याला दार बंद असल्याचे आढळले. म्हणून त्याने जोरजोरात दार वाजवले. दार उघडले नाही म्हणून त्याने दार तोडून आत प्रवेश केल्यावर डॉक्टरांचा मृतदेह आढळून आला. त्याने या घटनेची माहिती अन्य डॉक्टरांना दिली व त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.मयताजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आर्थिक नैराश्य व वैयक्तिक कारणातून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये.’

डॉक्टरांनी चिठ्ठीत पत्नीला ‘सॉरी’ असाही संदेश दिलेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित डॉक्टरांकडून माहिती घेतली असून, हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.