Fri, Nov 16, 2018 11:56होमपेज › Ahamadnagar › लंगड्या समितीसमोर अर्थसंकल्प नको!

लंगड्या समितीसमोर अर्थसंकल्प नको!

Published On: Mar 16 2018 12:44AM | Last Updated: Mar 16 2018 12:44AMनगर : प्रतिनिधी

16 सदस्य असणार्‍या महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये निम्म्याहून अधिक जागा रिक्‍त आहे. रिक्‍त असलेल्या 9 जागांवर नवीन सदस्यांच्या निवडी होईपर्यंत अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयासाठी सभा काढण्यात येवू नये, अशी मागणी करत शासनाने निर्देश देऊनही सदस्य निवडी केल्या जात नसल्याची तक्रार विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी ‘नगरविकास’कडे केली आहे. 
स्थायी समितीमधील 3 सदस्यांच्या निवडी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रद्द झाल्या. तर काँग्रेसची एक जागा रिक्‍तच ठेवण्यात आलेली आहे.

31 जानेवारीला 5 सदस्य निवृत्त झाले. त्यामुळे सध्या 7 सदस्यांवरच समितीचा कारभार सुरु आहे. मनपा अधिनियमानुसार सदस्य निवृत्त होणार असल्याच्या तारखेच्या मागील महिन्याच्या पहिल्या सभेत अशा रिक्‍त जागांवर सदस्यांच्या निवडी कराव्यात, अशी तरतूद आहे. मात्र, याबाबत कार्यवाही होत नसल्याने बोराटे यांनी 20 जानेवारीलाच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती. ‘नगरविकास’नेही 23 जानेवारीलाच आयुक्‍तांना पत्र पाठवून तरतुदींनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही सदस्यांच्या जागा रिक्‍तच आहेत.

बाळासाहेब बोराटे यांनी या संदर्भात काल (दि.15) पुन्हा प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना पत्र पाठवून रिक्‍त जागांच्या निवडी होत नसल्याकडे लक्ष वेधले आहे. मनपाचा अर्थसंकल्प, आर्थिक व भांडवली बाबींशी निगडीत महत्वाच्या विषयांसाठी अपूर्ण असलेल्या स्थायी समितीची सभा घेण्यात येऊ नये. याबाबत शासन स्तरावरुन तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली असून याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही बोराटे यांनी दिला आहे. सदस्य निवडीसाठी अनेक सदस्यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे महापौरांकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.