Sun, May 19, 2019 22:23होमपेज › Ahamadnagar › दिव्यांग बालके साहित्यपासून वंचित

दिव्यांग बालके साहित्यपासून वंचित

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 13 2018 11:17PMनगर : प्रतिनिधी

मॉडेल स्कुल (दिव्यांग बालके) उपक्रमापासून जिल्ह्यातील बालके 7 वर्षांपासून वंचित आहेत. कोपरगाव वगळता एकाही तालुक्यात बालकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

वाकचौरे म्हणाले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (अंध, कर्णबधीर, मतिमंद) साहित्य साधने खरेदीसाठी आर्थिक तरतूद उपलब्द्ध करून देण्यात येते. जिल्ह्यात कोपरगाव विकास गट वगळता उर्वरित तालुक्यात लाभार्थ्यांना सन 2010-11 पासून साहित्य साधने उपलब्द्ध करून देण्यात आली नाहीत. शासन स्तरावरून यासाठी भरघोस निधी मिळत असतांना शिक्षण विभागाच्या गलथानपणामुळे लाभार्थी वंचित आहेत. यावर योग्य कारवाई करून दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कडक शासन करण्यात यावे.

शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहावे

प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या. नुकतेच शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी 128 शाळांची पाहणी केली असता 35 शिक्षक गैरहजर तर 796 विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. शिक्षकांच्या सोईनुसार निर्णय होऊनही शिक्षक गैरहजर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षकांनी सकाळच्या सत्रात वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहनही वाकचौरे यांनी केले आहे.