Sun, Nov 18, 2018 00:45होमपेज › Ahamadnagar › कर्जमाफीसाठी जिल्ह्याची ‘यलो लिस्ट’ही जाहीर

कर्जमाफीसाठी जिल्ह्याची ‘यलो लिस्ट’ही जाहीर

Published On: Jan 12 2018 1:50AM | Last Updated: Jan 11 2018 11:11PM

बुकमार्क करा
नगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पाच ‘ग्रीन लिस्ट’ जाहीर केल्यानंतर शासनाने आता 27 हजार शेतकर्‍यांचा समावेश असलेली पहिली ‘यलो लिस्ट’ जाहीर केली आहे. त्यात कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या मात्र अर्जात विविध प्रकारच्या त्रुटी असलेल्या शेतकर्‍यांच्या नावाचा समावेश आहे. ‘यलो लिस्ट’मधील शेतकर्‍यांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर या शेतकर्‍यांचा समावेश ‘ग्रीन लिस्ट’मध्ये करण्यात येणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेले कर्जमाफीचे काम नववर्षातही सुरूच आहे. अजून कमीत कमी तीन महिने हे काम सुरु राहण्याची शक्यता आहे. कर्जमाफीच्या पहिल्या ग्रीन लिस्टमध्ये दोन हजार 354 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यापैकी 2 हजार 331 शेतकर्‍यांच्या खात्यावर 12 कोटी 31 लाख 52 हजार 962 रुपये वर्ग करण्यात आले. दुसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये 5 हजार 128 शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यापैकी 1 हजार 85 शेतकर्‍यांच्या खात्यावर 4 कोटी 12 लाख 23 हजार 492 रुपये जमा करण्यात आले आहेत.

तिसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातल्या 77 हजार 939 शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यापैकी 55 हजार 671 शेतकर्‍यांच्या खात्यावर 265 कोटी 70 लाख 81 हजार 260 रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. चौथ्या ग्रीन लिस्टमध्ये सर्वाधिक 1 लाख 12 हजार 44 शेतकरी समाविष्ट आहेत. त्यापैकी 86 हजार 472 शेतकर्‍यांच्या खात्यावर 150 कोटी 4 लाख 89 हजार 207 रुपये जमा करण्यात आले. पाचव्या ग्रीन लिस्ट मध्ये 50 हजार 162 शेतकरी आहेत. त्यापैकी 32 हजार 789 शेतकर्‍यांच्या खात्यावर 88 कोटी 3 लाख 58 हजार 597 रुपये वर्ग करण्यात आले आहेत.