Thu, Apr 25, 2019 07:44होमपेज › Ahamadnagar › जिल्हा गटशेतीत प्रथम क्रमांकावर

जिल्हा गटशेतीत प्रथम क्रमांकावर

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:46PMनगर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी गट शेती हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यात गटशेतीचे काम उत्कृष्ट असून, त्यामध्ये राज्यात जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले.

कृषी विभागाच्या वतीने आयोजित उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळेप्रसंगी डॉ. विश्‍वनाथा बोलत होते. यावेळी संचालक विस्तार व शिक्षण डॉ. किरण कोकाटे, डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे, कृषी उपसंचालक विलास नलगे, सुधाकर बोराळे, डॉ. कल्याण देवळाणकर, डॉ. यु. बी. होले आदी उपस्थित होते.

विश्‍वनाथा पुढे म्हणाले की, कपाशीवरील गुलाबी बोंडअळीमुळे शेतकरी हताश झाला आहे. मागील वर्षी शेतकर्‍यांचे नुकसान लक्षात घेता येणार्‍या वर्षी त्यावर उपयायोजना कराव्यात. शेतकर्‍यांना औषध फवारणीचे प्रात्यक्षिक द्यायला हवे. तळागाळातील शेतकर्‍यांचे ग्रुप करून त्यांचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकर्‍याने कंपोस्ट खत तयार केले पाहिजे. जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकर्‍यांचं उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी दुग्ध व्यवसाय खूप महत्त्वाचा घटक आहे. कृषी विभाग आणि विद्यापीठ यांच्या समन्वयााने शेतकर्‍यांसाठी काम करू, असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. कोकाटे म्हणाले की, जिल्ह्याचे आर्थिक उत्पादन वाढले आहे. प्रत्येक शेततळ्यात मत्स्यपालन केले, तर वर्षाकाठी 35 हजार उत्पन्न मिळेल. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे सांगितले. यावेळी लोणारे यांनी विविध योजनांची माहिती देऊन 2 मे रोजी किसन कल्याण दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले.