Sun, Jun 16, 2019 03:07होमपेज › Ahamadnagar › जिल्हा विभाजनाबाबत सकारात्मक :महसूलमंत्री

जिल्हा विभाजनाबाबत सकारात्मक :महसूलमंत्री

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:55AMनगर : प्रतिनिधी

राज्यभरातील जिल्हा व तालुका विभाजनाच्या प्रस्तावांबाबत समित्यांकडून अहवाल प्राप्त झाले आहेत. नगर जिल्हा विभाजनाचा अहवालही आलेला आहे. याबाबत नागरिकांची भावना लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री राम शिंदे यांनीही  मांडलेली आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाच्या निर्णयाबाबत सरकार  सकारात्मक असल्याचे सांगत, शासन स्तरावरही विभाजनाच्या हालचालींना वेग आल्याचे संकेत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत. नगर येथील पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा व तालुका विभाजनाबाबतच्या प्रस्तावांवर अहवाल मागविण्यासाठी समित्या नियुक्‍त केल्या होत्या. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाले आहेत. नगर जिल्ह्याच्या विभाजनाबाबत पालकमंत्री शिंदे यांनीही जनतेच्या भावना मांडल्याने अहवाल तपासून विभाजनाबात निर्णय घेण्यात येईल. सरकार सकारात्मक आहे, असे त्यांनी सांगितले.

नगर शहरातील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या प्रश्‍नावर त्यांना छेडले असता, उड्डाणपूल नक्‍की होणार आहे, डीपीआर अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 15 वर्षांत रखडलेले सर्व प्रश्‍न एकाच वर्षात मार्गी कसे लागणार? असा प्रतिसवाल करत आघाडी सरकारच्या काळातच उड्डाणपूलाचा प्रश्‍न रखडल्याचा टोलाही त्यांनी लगावला.  नगर महापालिकेतील सर्व प्रकरणे माझ्यापर्यंत आली आहेत, असे सूचक वक्‍तव्यही ना. पाटील यांनी केले. पालकमंत्री शिंदे, खा. दिलीप गांधी, उपमहापौर श्रीपाद छिंदम, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सुवेंद्र गांधी आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा विभाजनाचा रेंगाळलेला प्रश्न अलिकडच्या काही दिवसांत पुन्हा चर्चेत आला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन करणारच असल्याचे काही दिवसांपूर्वीच कोकमठाण येथे बोलताना सांगितले होते. त्यानंतर महसूल मंत्री पाटील यांनीही काल जिल्हा विभाजनाबाबत सकारात्मक असल्याचे व पालकमंत्र्यांनी जनतेचीच भावना मांडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारच्या स्तरावरही विभाजनाच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.