Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Ahamadnagar › ‘जिल्हा नियोजन’कडून महापालिकेची उपेक्षाच!

‘जिल्हा नियोजन’कडून महापालिकेची उपेक्षाच!

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 18 2018 11:02PMनगर : प्रतिनिधी

शहरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाने गेल्या वर्षभरात (2017-18) रुपयाचाही निधी महापालिकेला दिलेला नसल्याचे पुढे आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते जीपीओ रस्त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी निधी देण्याची तयारी दर्शवत प्रस्ताव मागविला होता. मात्र, हा प्रस्तावही अनेक महिन्यांपासून अडगळीतच पडल्याचे चित्र आहे.

जिल्हा नियोजन मंडळातून वार्षिक आराखड्यात नाविण्यपूर्ण योजनांमधून महापालिकेसह सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना निधी दिला जातो. दोन वर्षांपूर्वी मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील ब्लड बँकेच्या रक्‍तविघटन प्रयोगशाळेतील साहित्य व उपकरणे खरेदीसाठी 94 लाखांचा निधी देण्यात आला होता. तसेच सावेडीतील आयुर्वेद व योग भवनासाठी निधी देण्यात आला होता.

2017-2018 मध्येही महापालिका प्रशासन, महापौर व आमदार संग्राम जगताप यांनी विविध कामांना निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालय ते जीपोओ रस्त्यासाठीही 1.76 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे. या रस्त्यावरील ड्रेनेजचा प्रश्‍न गंभीर झालेला असतांना तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी या कामासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी मनपाला पत्र पाठवून प्रस्तावही मागविण्यात आला होता. महासभेच्या मंजुरीने सदरचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, अद्यापही या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही.

नियोजन मंडळातून लोकसंख्येच्या निकषानुसार पालिकांना निधी वितरीत केला जातो. नाविण्यपूर्ण योजनेतूनही काही कामांसाठी निधीची तरतूद केली जाते. मात्र, शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्या विचारात घेवून इतर नगरपालिकांपेक्षा महापालिकेला अपेक्षित निधी देणे आवश्यक आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांची कायम वर्दळ असते. सर्व प्रमुख अधिकारीही शहरातच वास्तव्यास आहेत. असे असतांनाही महापालिकेला गेल्या वर्षभरात रुपयाचाही निधी जिल्हा नियोजनकडून मिळालेला नाही. शहराच्या महापौर, आमदारांसह तीन नगरसेवक या समितीचे सदस्य आहेत. असे असतांनाही समितीकडून मापालिकची आजवर उपेक्षाच होत असल्याचे चित्र आहे.