Wed, Jun 26, 2019 23:55होमपेज › Ahamadnagar › आबांच्या गुगलीने विरोधक ‘क्‍लिन बोल्ड’!

आबांच्या गुगलीने विरोधक ‘क्‍लिन बोल्ड’!

Published On: Jun 04 2018 1:02AM | Last Updated: Jun 03 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभेत गोंधळाची परंपरा यावर्षी खंडित झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जिल्हा परिषद सदस्य राजेश (आबा) परजने यांच्या गुगलीने विरोधकांना तर ‘क्‍लिन बोल्ड’ केलेच, पण सत्ताधार्‍यांच्या मनमानीलाही लगाम घातला. त्यामुळे सुरुवातीलाच वादाची किनार चढलेली सर्वसाधारण सभा नंतर मात्र शांततेत पार पडली.

अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडीट को- ऑप. सोसायटीची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी परजणे होते. यावेळी जि.प.सदस्य संदेश कार्ले, संस्थेचे चेअरमन हरी शेळके, अरूण जोर्वेकर, संजय कडूस, सोपान हरदास, भरत घुगे, अरूण शिरसाठ, विलास वाघ, प्रताप गांगर्डे, ज्ञानदेव जवणे, संजू चौधरी, मोहन जायभाये, राजाबापू पाठक, वालचंद ढवळे, नारायण बोराडे, इंदू गोडसे, शशिकांत रासकर, अशोक काळापहाड, व्यवस्थापक अविनाश शिदोरे आदी उपस्थित होते. यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.

सभेच्या सुरुवातीला विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. सत्ताधारी गटाचे समर्थकही आक्रमक झाले होते. मात्र सभेचे अध्यक्ष परजने यांनी अध्यक्षांच्या परवानगीशिवाय बोलायचे नाही, असे सांगत सर्वांना शांत केले. त्यानंतर परजने यांच्या परवानगीने सर्वांना बोलायची संधी दिली. मागील निवडणुकीत सुमारे 10 लाखांचा खर्च झाला. पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद न करता ज्यावेळी निवडणूक असेल त्यावर्षी एकरकमी खर्च दाखविण्याचे निर्देश देण्यात आले.

संस्थेच्या लेखापरिक्षणावर 10 लाखांची तरतूद करण्याला विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे यंदापासून ई-टेंडरिंग पद्धतीने लेखापरिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सभासद कल्याण निधी 50 रुपये महिन्यावरून 200 रुपये करण्याचा विषय मंजूरीसाठी आल्यानंतर अनेकांनी याला विरोध दर्शविला. यावर चर्चा झाल्यानंतर 1200 रुपये एकरकमी वर्षाला कपात करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 2 लाख रुपये मिळणार आहेत.

परजणे म्हणाले की, 100 टक्के कर्जवसुलीची हमी असलेल्या मोजक्या संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश आहे. त्यामुळे येथे काम करताना सर्व संचालकांनी सभासदांना विश्वासात घेवूनच चांगले निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. संस्थेचा कारभार अतिशय उत्तम चालू असल्यानेच संस्थेची यशस्वी घोडदौड होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. आभार विलास वाघ यांनी मानले. यावेळी सर्व संचालक, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.