Sun, Jul 21, 2019 11:59होमपेज › Ahamadnagar › जिल्हाधिकार्‍यांचे ‘पीए’ परेशान

जिल्हाधिकार्‍यांचे ‘पीए’ परेशान

Published On: May 06 2018 1:06AM | Last Updated: May 05 2018 11:01PMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्याचा कारभार हाकणार्‍या जिल्हाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांना ‘मिस्ड कॉल’ देणार्‍या महाभागाने परेशान केले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने ‘मिस्ड कॉल’ करत स्वीय सहाय्यकांना त्रास देण्यात येत आहे. याबाबत तक्रार करायला कोणी धजावत नसल्याने ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ खाण्याची वेळ स्वीय सहाय्यकांवर आली आहे.

जिल्हाभरातील नागरिक तक्रारी, व्यथा मांडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे येत असतात. जिल्हाधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवर संपर्क करत असतात. दूरध्वनीवरून त्यांना सर्व माहिती मिळते. अनेक वर्षांपासून ह्या पद्धतीचा वापर केला जातो. ही बाब स्वीय सहाय्यकांची नित्याचीच. मात्र गेल्या दीड महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दूरध्वनीवर येणार्‍या ‘मिस्ड कॉल्स’ने कर्मचारी परेशान झाले आहेत. 

एका मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनीवर ‘मिस्ड कॉल’ करण्यात येतो. स्वीय सहाय्यकांनी ‘मिस्ड कॉल’ आलेल्या क्रमांकावर पुन्हा कॉल केला असता, रिंग ऐकू येते. मात्र ‘मिस्ड कॉल’ करणारा ‘महाभाग’ फोन उचलत नाही, उचलला तरी काही बोलत नाही. मोबाईलवरील ‘ट्रू कॉलर’ अ‍ॅप्लिकेशनवर क्रमांक शोधला असता नाव येत नाही. त्यामुळे ‘मिस्ड कॉल’ करणार्‍याला ओळखायचे तरी कसे? असा गहन प्रश्न स्वीय सहाय्यकांना पडला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयीन दूरध्वनीवर मोठ्या प्रमाणावर अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधींचे फोन येत असतात. अशावेळी अज्ञात व्यक्तीकडून सातत्याने ‘मिस्ड कॉल’ येत असल्याने महत्वाच्या कामात अडथळा होत आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यासच अशा प्रकारांना आळा बसणार आहे.