Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Ahamadnagar › ‘शिल्पा गार्डन’ला जिल्हाधिकार्‍यांचा दणका!

‘शिल्पा गार्डन’ला जिल्हाधिकार्‍यांचा दणका!

Published On: Jun 25 2018 1:44AM | Last Updated: Jun 24 2018 11:27PMनगर : प्रतिनिधी

‘मिशन सीना’ अंतर्गत नदी पात्राच्या रुंदीकरण व खोलीकरण मोहिमेत अडथळा ठरणार्‍या व गाळपेर जमिनींवर करण्यात आलेल्या पक्क्या अतिक्रमणांवर सुरु असलेल्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी महसूल विभागाने कारवाई करत शिल्पा गार्डनचे अतिक्रमण भुईसपाट केले. यात लॉनसह प्रायमरी शाळेच्या खोल्याही जमीनदोस्त करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तेथील गाळपेर रद्द करुन जमिन सरकारजमा केल्यानंतर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करुन जागा ताब्यात घेण्यात आली.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पुढाकार घेत सीना पात्रातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे. महसूल प्रशासनासह मनपा, पाटबंधारे, भूमिअभिलेख, पोलिस अशा सर्व विभागांमार्फत एकत्रितपणे ही कारवाई सुरु आहे. शनिवारी (दि.23) मनपा प्रशासनाने पुना रोडवरील नदी पात्रात अतिक्रमण केलेल्या भारत मार्बलचे अतिक्रमण हटविले. त्यानंतर दुपारी महसूल विभागाच्या पथकाने भिंगार सर्वे नंबर 23 मधील शिल्पा गार्डन व शेजारील प्रायमरी स्कूलच्या अतिक्रमणावर हातोडा मारला. प्रांताधिकारी व तहसीलदारांना या कारवाईचे आदेश जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आले होते. भरपावसात कारवाई करुन तेथील शाळेच्या खोल्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. पावसाचा जोर वाढल्यामुळे उरकती घेण्यात आलेली कारवाई काल (दि.24) पूर्ण करण्यात आली.

सकाळी 8 वाजल्यापासून महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी शिल्पा गार्डनचे उवर्र्रीत अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. तर मनपाचे अधिकारी शेजारील भारत मार्बलचे राहिलेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण करत होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शिल्पा गार्डनचे संचालक शरद मुथा यांनी कारवाईच्या ठिकाणी येवून न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिल्याचा दावा करत कारवाई थांबविली. महसूलच्या कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांना याची माहिती देताच प्रांताधिकारी गाडेकर यांच्यासह नायब तहसीलदार वैशाली आव्हाड, अर्चना भाकड-पागिरे, मंडलाधिकारी राजेंद्र आंधळे, रिजवान शेख आदी कारवाई स्थळी हजर झाले. न्यायालयाचे लेखी आदेश असल्याशिवाय कारवाई थांबणार नाही, असे प्रांताधिकार्‍यांनी स्पष्ट करत कारवाईला पुन्हा सुरुवात केली. शिल्पा गार्डनमधील लॉनपर्यंत सीना पात्राची हद्द निश्‍चित करुन चर खोदण्यात आली. यावेळी मुथा यांनी पोकलॅन मशिनसमोर उभे राहून कारवाई थांबविण्याचा प्रयत्नही केला. कारवाई थांबविण्याबाबत लेखी निवेदन देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाचा लेखी आदेश असेल तरच प्रत स्वीकारण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांनी घेतला व स्वतःच्या उपस्थितीत कारवाई पूर्ण केली.

दरम्यान, भिंगार सर्वे नंबर 28 मधील आनंद मार्बलवर कारवाई करण्याचे आदेश मनपाला देण्यात आले होते. त्यानुसार महसूल अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मनपाच्या पथकाने दुपारनंतर डुंगरवाल यांच्या आनंद मार्बलवरही कारवाई केली. अतिक्रमण असलेल्या जागेतील साहित्य हटविण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती. मुदत संपताच साडेचार वाजण्याच्या सुमारास कारवाई करुन पत्र्याची शेड, पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमणधारकाने स्वतःहून काढून घेतलेले बांधकामाचे साहित्य रात्रीपर्यंत हटवून घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. आज (दि.25) सकाळी पुन्हा महसूलच्या पथकाकडून या ठिकाणी चर खोदून हद्द निश्‍चित केली जाणार आहे. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनीही प्रत्यक्ष येवून कारवाईची माहिती घेतली. जिल्हाधिकारी द्विवेदी हेही प्रांताधिकार्‍यांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत कारवाईवर लक्ष ठेवून होते.

शिल्पा गार्डनपासून मनपा प्रशासन लांबच!

शिल्पा गार्डनवरील संपूर्ण कारवाई दरम्यान महापालिका अधिकार्‍यांना दूर ठेवण्यात आले होते. मनपाने काही वर्षांपूर्वी तेथील अतिक्रमणाबाबत संबंधितांना नोटीस बजावली होती. मात्र, सदरची जमिन महसूल विभागाकडून हस्तांतरीत झालेली असल्याने मनपाच्या नोटिसीला स्थगिती देण्यात आली होती. या ठिकाणी कारवाई करण्यासही मनपाला मनाई असल्यामुळे महसूल विभागामार्फत पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.