Wed, Aug 21, 2019 19:02होमपेज › Ahamadnagar › दुधावर आली आफत.. वाटपच केले मोफत..!

दुधावर आली आफत.. वाटपच केले मोफत..!

Published On: Jul 17 2018 1:28AM | Last Updated: Jul 16 2018 11:31PMढोरजळगाव : वार्ताहर

दुधाला भाव मिळत नसल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात असणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ढोरजळगाव परिसरातील दूध उत्पादकांनी दुधाचे मोफत वाटप करीत अनोखे आंदोलन केले.

गेल्या काही काळापासून दुधाच्या दरात कमालीची कपात झाल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला.अनेक दिवस वाट पाहूनही दुधाला भाववाढ न मिळाल्याने दूध उत्पादक हवालदिल झाला. दुभत्या गायींची कवडीमोल भावात विक्री करावी लागली. अनेक गोठेच्या गोठे रिकामे झाले. शेतीला जोडधंदा म्हणून ओळखला जाऊ लागलेला हा व्यवसाय खिल्ली उडवण्याइतपत चेष्टेचा विषय बनला. सध्या तर या व्यवसायाला पूर्ण अवकळा आल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. खा.राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून, ढोरजळगाव परिसरातून या आंदोलनाला पाठिंबा देत येथील शेतकर्‍यांनी काल दूध बंद आंदोलन यशस्वीरीत्या पार पाडले.

आतापर्यंत अनेकवेळा रस्त्यावर दूध ओतून आंदोलने करण्यात आली.मात्र, परिसरातील शेतकर्‍यांनी दुधाची विक्री न करता मोफत दूध वाटप करून या आंदोलनाला वेगळे स्वरूप देण्याचा अनोखा उपक्रम राबवला.

दूध उत्पादक चोहोबाजूंनी अडचणीत

शासनाने ठरवून दिलेल्या भावानुसारच आम्ही शेतकर्‍यांना त्याचे वाटप करतो. दूध उत्पादक सगळीकडूनच अडचणीत सापडला असून, त्यांच्या आंदोलनाची सरकारने दाखल घेतल्यासच हा व्यवसाय टिकेल.अन्यथा या व्यवसायाला लवकरच अवकळा येईल. - रघुवीर उगले, भैरवनाथ दूध संकलन केंद्र, आखतवाडे.

जनावरे पाळायची कशी?

पेंड-भुशाचे भाव कमी होत नाहीत आणि दुधाचे भाव वाढतच नाहीत.जनावरांवर होणारा खर्च आणि दुधाला मिळणारा भाव याचा काही केल्या ताळमेळ बसत नाही.अशा परिस्थितीत आम्ही जनावरे कशी पाळायची?   - सुभाष शिंदे, मळेगाव, ता. शेवगाव.