Fri, Apr 26, 2019 09:55होमपेज › Ahamadnagar › पोलिस ठाण्यात बाचाबाची

पोलिस ठाण्यात बाचाबाची

Published On: May 10 2018 1:32AM | Last Updated: May 10 2018 12:04AMसंगमनेर : प्रतिनिधी

मागील मारामारी प्रकरणातील आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली. मात्र, या आरोपीला सोडविण्यासाठी जि. प. चे सभापती अजय फटांगरे यांनी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली, असा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शहर शिवसेनेने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केल्याने संगमनेरातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. 

गेल्या 20 एप्रिलला संगमनेरातील शुभम उर्फ लाल्या रहाणे याचे सिन्नरच्या गुरेवाडी फाट्यावरून शहरातील नऊजणांनी अपहरण  केले होते. अपहरणकर्त्यांनी आपल्या डोक्याला ‘गावठी कट्टा’ लावल्याचे  फिर्यादी रहाणे याचे म्हणणे होते. मात्र, सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करताना त्यातून ‘कट्ट्या’चा उल्लेख वगळल्याचा आरोप शुभम रहाणे याने केला आहे.

या घटनेनंतर त्याच दिवशी रात्री 8 वाजेच्या सुमारास माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या गणेशनगर येथील घरासमोर शुभम उर्फ लाल्या रहाणे, राजेंद्र कानवडे, साया शिंदे, गणेश बेलापूरकर, अभिजित रहाणे, विकास आव्हाड, ऋषी गिरी, अनिल गायकवाड, लखन शिंदे, शुभम शिंदे, सूरज जगताप आदींसह  15 ते 20 जणांनी दुपारच्या घटनेच्या अनुषंगाने कार्तिक बाबूराव जाधव या तरुणाला मारहाण केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून वरील प्रकरणातील सर्व आरोपी पसार झाले होते. या  प्रकरणातील राजेंद्र संताजी कानवडे हा त्याच्या निमगाव पागा येथील घरी आल्याची माहिती उपनिरीक्षक पंकज निकम यांना  मिळाली.

त्यांनी तात्काळ सापळा लावून त्यास अटक केली. मात्र, त्याला सोडविण्यासाठी जि. प. पशुसंवर्धन विभागाचे सभापती अजय फटांगरे हे पोलिस ठाण्यात आले आणि कानवडे यास सोडून द्या, असे पोलिसांना सांगितले. त्यातून  फटांगरे यांनी पोलिसांना अरेरावीची भाषा वापरल्याचे शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख संजय फड, कैलास वाकचौरे, सोमनाथ कानकाटे,  समीर ओझा, भैय्या तांबोळी यांनी केली आहे. दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

महामार्गाच्या चर्चेसाठी ठाण्यात गेलो होतो

आंबी खालसा येथील महामार्गाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी पोलिस उपअधीक्षकांच्या निमंत्रणावरुन मी पोलीस ठाण्यात गेलो होतो. यावेळी एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने आरोपीचे तुम्ही समर्थन का करता म्हणून माझ्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. यावेळी संबंधित अधिकार्‍यासोबत माझी शाब्दिक बाचाबाची झाली होती. मात्र, मी कोणत्याही आरोपीला सोडविण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात गेलो नसल्याचे जि. प. सदस्य अजय फटांगरे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.