Thu, Jun 20, 2019 01:12होमपेज › Ahamadnagar › छिंदम यांच्या उपमहापौरपदाच्या राजीनाम्याबाबत संभ्रम!

छिंदम यांच्या उपमहापौरपदाच्या राजीनाम्याबाबत संभ्रम!

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:20PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणार्‍या श्रीपाद छिंदम याने उपमहापौरपदाच्या दिलेल्या राजीनाम्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिका अधिनियमानुसार महापौरांच्या नावाने उपमहापौराने राजीनामा देण्याची गरज आहे. असे असताना भारतीय जनता पार्टीच्या महानगर जिल्हाध्यक्षांकडे दिलेल्या राजीनाम्याची प्रत त्याने महापौर व आयुक्‍तांना पाठविली आहे. त्यामुळे भाजपाकडून दिशाभूल केली जात असल्याचे बोलले जात असून, त्याच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

उपमहापौर छिंदम याने महापालिका कर्मचार्‍याशी फोनवरून बोलताना शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्‍तव्य केले होते. या वक्‍तव्याची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे शहरासह जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. छिंदम याचे घर, कार्यालयाची संतप्त शिवप्रेमींनी तोडफोड केली. शहरात शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसे या राजकीय पक्षासह विविध संघटनांनी मोर्चे काढत, छिंदम याचे प्रतिकात्मक पुतळे जाळत, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत  तीव्र निषेध नोदविला. भाजपाच्या कार्यालयासह पालकमंत्र्यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. शिवसेनेच्या फिर्यादीवरून छिंदम यांच्याविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, छिंदम याच्या वक्‍तव्याचे उमटलेले तीव्र पडसाद पाहून भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. छिंदम याची पक्षातून हकालपट्टी केल्याचे तसेच त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खा. गांधी यांनी सांगितले होते. मात्र, छिंदम याने उपमहापौरपदाचा दिलेला राजीनामा हा भाजपाच्या महानगर जिल्हाध्यक्षांच्या नावाने आहे. याच पत्राच्या प्रती महापौर सुरेखा कदम व महापालिका आयुक्‍त घनश्याम मंगळे यांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 (सुधारित) मधील कलम 19 चे पोटकलम 4 अन्वये उपमहापौराने महापौरांच्या नावाने राजीनामा देणे आवश्यक असते. मात्र, छिंदम याने तसे केलेले नसल्याने हा राजीनामा अधिकृत मानायचा कसा, याबाबत संभ्रम आहे. भाजपा महानगर जिल्हाध्यक्षांकडे  उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याच्या पत्राची प्रत महापौर व आयुक्‍तांना पाठविण्यामागचे नेमके प्रयोजन काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.