Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Ahamadnagar › ऊसदराबाबतची चर्चा दुसर्‍यांदा फिस्कटली

ऊसदराबाबतची चर्चा दुसर्‍यांदा फिस्कटली

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:49AM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत ऊसदराबाबत साखर कारखानदार व  ऊसउत्पादक संघर्ष समितीच्या प्रतिनिधींत सर्वमान्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे ऊसदराबाबतची दुसरी बैठकही निष्फळ ठरली आहे.  या बैठकीत ऊसउत्पादक संघर्ष समितीने  मध्यम मार्ग म्हणून 2 हजार 550 रूपये पहिल्या उचलीचा प्रस्ताव मांडला. परंतु साखरेचे दर सतत घसरत असल्याने, प्रतिटन 2 हजार 300 रुपयांपेक्षा अधिक दर देणे शक्य नाही, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली. ही भूमिका अमान्य करत,  ऊसउत्पादक संघर्ष समितीने बैठकीतून काढता पाय घेत, लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे.

प्रभारी जिल्हाधिकारी विश्‍वजित माने यांनी काल (दि.6) जिलल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार व ऊसउत्पादक संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी विश्‍वजीत माने , जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा ,प्रादेशिक सहसंचालक (साखर ) संगीता डोंगरे , शिर्डी उपविभागीय अधिकारी रविंद्र ठाकरे , नगर उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर साखर कारखान्यांचे प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत संघर्ष समितीचे बन्सी सातपुते यांनी संघर्ष समितीची भूमिका मांडली.ऊसाच्या प्रतिटनाला कमीत कमीत कमी 2 हजार 550 पहिली उचल देण्यात यावी. आजमितीस 2 हजार 300 रुपये दर जाहीर करा आणि उर्वरित  250 रुपये जानेवारीपर्यंत अदा करावेत, असा प्रस्ताव  डॉ. अजित नवले यांनी बैठकीत मांडला. यावेळी शिवाजी जवरे, सुरेश ताके , भूपेंद्र काले, अजय महाराज बारस्कर, रावसाहेब लवांडे  आदींनी मते मांडली. 

साखर कारखान्यांच्या वतीने थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांनी कारखानदारीपुढील अडचणींचा पाढा वाचला.साखरेचे दर सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे 2 हजार 300 रुपयांपेक्षा अधिक दर देणे परवडत नाही, अशी भूमिका मांडली. या भूमिकेला केदारेश्‍वर व ज्ञानेश्‍वर कारखाना वगळता सर्वांनीच पाठींबा दर्शविला.  

यावेळी बैठकीत कारखाना प्रतिनिधी आणि ऊसउत्पादक संघर्ष समितीच्या प्रतिनिधींत शाब्दिक चकमकी झाल्या. प्रभारी जिल्हाधिकारी माने यांनी कोण किती दर जाहीर करणार याचा आढावा घेतला. अशोक व वृद्देश्‍वर कारखान्याने 2300 रुपये देण्यास देखील असंमती दाखविली.  तर उर्वरित कारखानदारांनी मात्र 2 हजार 300 वरच ठाम असल्याचे सांगितले. ऊसउत्पादक संघर्ष समितीला हा तोडगा मान्य नसल्याने, त्यांनी लोणी येथे आजपासून आंदोलन करणार असल्याचे जाहीर करत सभागृहातून  काढता पाय घेतला. तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. परंतु कोणताही तोडगा निघाला नसल्याने दुसर्‍यांदा ऊसदराबाबतची बैठक फिस्कटली आहे.