Wed, May 22, 2019 15:21होमपेज › Ahamadnagar › अविश्‍वास ठराव फेटाळला

अविश्‍वास ठराव फेटाळला

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 11:16PMशेवगाव : प्रतिनिधी

शेवगावच्या नगराध्यक्षा विद्याताई लांडे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. ठराव समंत होण्यासाठी  16 नगरसेवकांची आवश्यकता असताला बैठकीस 14 नगरसेवक उपस्थित राहिल्याने हा ठराव फेटाळण्यात आला.

शेवगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्या विरुध्द 21 पैकी 15 नगरसेवकांनी एकत्र येऊन 7 जून रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे  अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 12) नगरपरिषद कार्यालयात झालेल्या नगरसेवकांच्या विशेष बैठकीस अविश्वास ठराव दाखल करणार्‍या 15 पैकी भाजपाचे सर्व 8, राष्ट्रवादीचे 4, अपक्ष 2 व गटनेते सागर फडके असे 14 नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या फुटीर गटातील नगरसेवक विकास फलके यांच्यासह अध्यक्ष गटाचे 7 नगरसेवक अनुपस्थित होते.

दुपारी दोन वाजता सुरु झालेल्या बैठकीत  प्रांताधिकारी डॉ. बांदल यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने असणार्‍या सदस्यांना हात वर करून मतदान करण्याची सूचना केली. त्यावेळी उपस्थित सर्व 14 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मात्र शेवगाव नगर परिषदेची एकूण सदस्य संख्या 21 असून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55 (3) , 55 ( 4) व 55 ( 5) नुसार एकूण सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश  म्हणजे 16 सदस्यांचे अविश्वास ठरावाच्या बाजूने मत असणे आवश्यक होते. परंतु 14 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले असल्याने हा ठराव फेटाळण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी डॉ. बांदल यांनी जाहीर केले. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागता येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, हा ठराव फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते सागर फडके, भाजपचे नगरसेवक अरूण मुंडे, अशोक आहुजा व राष्ट्रवादीचे नगरसेवक शब्बीर शेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अकार्यक्षम अध्यक्षामुळे शहराचा विकास झाला नाही. आज तांत्रिक कारणामुळे अविश्वास ठराव फेटाळला असला, तरी आम्ही सर्व 14 नगरसेवक एकत्र आहोत. येत्या दोन महिन्यांत होणार्‍या नवीन नगराध्यक्ष निवडीवेळी आमचाच नगराध्यक्ष होईल. सध्या सभागृहात बहुमत नसल्यामुळे सभागृह चालू शकत नाही. सर्वसामान्यांची भूमिका लक्षात घेता नगराध्यक्षांनी राजीनामा द्यायला हवा होता. हा ठराव व्यक्ती विरोधी नव्हता. शहराचे हित लक्षात घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत. सत्ताधार्‍यांनी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. तसेच पिठासीन अधिकार्‍यांवरही दबाव आणला. या बाबत न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्षा विद्या लांडे यांनी भाऊबंदकी व काही नगरसेवकांच्या वैयक्तीक हेव्या-दाव्याने हा प्रकार घडल्याचे म्हटले. आपण सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. महिला म्हणून दोन महिने नगराध्यक्षपदाचा कार्यकाल राहिला असताना, असा प्रकार व्हायला नको होता. माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नामुळे हा ठराव फेटाळला गेला आहे. पुढील काळात सर्व समविचारी लोकांना एकत्र घेऊन विकास कामे अखंड चालू ठेवू असे नगराध्यक्षांनी सांगितले.